रांजणगाव सांडस येथे दुचाकी खड्ड्यात आदळून युवक जखमी

रांजणगाव सांडस येथे दुचाकी खड्ड्यात आदळून युवक जखमी

Published on

आंधळगाव, ता.१ : रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने महाविद्यालयीन युवक जखमी झाल्याची घटना रांजणगाव सांडस (ता. शिरूर) येथे बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) सकाळी अकराच्या सुमारास घडली.
शुभम किसन मोरे (वय १९, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरूर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. शुभम मोरे हा रांजणगाव सांडस येथे वास्तव्यास असून तो दौंड तालुक्यातील केडगाव येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. बुधवारी सकाळी महाविद्यालयातून घरी परत येत असताना तो रांजणगाव सांडस फाट्याकडून गावाकडे दुचाकीवरून जात होता. यावेळी चेअरमनवस्ती परिसरात रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात त्याची बुलेट दुचाकी आदळली. त्यामुळे तो रस्त्यावर पडून जखमी झाला असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. रांजणगाव फाटा ते रांजणगाव सांडस गावापर्यंत रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत असल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या संदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन दिले असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com