घरोघरी जाऊन मतदारांशी साधणार संवाद
मांडवगण फराटा, ता. ३१ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शिरूर तालुका व जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. या दुःखद पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या, संयमी व संवेदनशील पद्धतीने प्रचार करण्याचा ठाम निर्णय वडगाव रासाई गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद उमेदवार सुजाता पवार यांनी घेतला आहे.
सुजाता पवार व वडगाव रासाई पंचायत समिती गणाचे उमेदवार विकास शेलार यांनी शनिवारी (ता. ३१) वडगाव रासाई व कोळगाव डोळस परिसरात थेट शेताच्या बांधावर जाऊन महिला मतदारांशी संवाद साधला. प्रचाराच्या पारंपरिक चौकटी मोडून शेतात, बांधावर, घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. सुजाता पवार म्हणाल्या, ‘‘अजितदादांचे अपघाती निधन झाल्याने या निवडणुकीत कोणताही दिखावा न करता साधेपणाने जनतेसमोर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ढोल-ताशे, भव्य सभा, बॅनरबाजी वा वाहन रॅलींपेक्षा मतदारांच्या दारात जाऊन त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधणे हाच आमचा प्रचाराचा मार्ग आहे. ग्रामीण भागातील मतदारांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेणे, शेतकरी, महिला व कष्टकरी घटकांच्या अडचणी समजून घेणे आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून आतापर्यंत केलेली विकासकामे थेट जनतेपर्यंत पोहोचवणे, हा प्रचाराचा केंद्रबिंदू आहे.’’
‘‘स्व. अजितदादांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेशी नातं जपलं. साधेपणा, कष्टकरी जनतेबद्दलची आपुलकी आणि कामातून बोलण्याची संस्कृती हीच त्यांची खरी ओळख होती. त्याच मूल्यांना अभिवादन म्हणूनच या निवडणुकीतही साधेपणा जपण्याचा निर्धार केला आहे. सभा घेऊन भाषणांपेक्षा मतदारांच्या घरात बसून संवाद साधणे अधिक महत्त्वाचे आहे. राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नसून समाजाशी असलेली नाळ आणि जबाबदारी आहे, ही भूमिका ठेवून दुःखाच्या या काळात आत्मसंयम, संवेदनशीलता आणि जनतेशी असलेले नाते अधिक घट्ट करत निवडणुकीला सामोरे जात आहे,’’ असे सुजाता पवार यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

