

मांडवगण फराटा, ता. १४ : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील सर्वात भव्य समजली जाणारी श्रीक्षेत्र वाघेश्वर देवस्थानाची यात्रा महाशिवरात्रीनिमित्त आजपासून (ता. १५) सुरू होत आहे. मांडवगण फराटा गावचे ग्रामदैवत असलेल्या वाघेश्वर देवाच्या यात्रेला सालाबादप्रमाणे भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित असून १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान धार्मिक विधींसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम येथे होणार आहेत.
यंदा यात्रेचे नियोजन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. संपूर्ण सोहळा सीसीटीव्ही नियंत्रणाखाली पार पडणार असून मंदिर परिसरात फ्लेक्स बोर्ड लावण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीनिमित्त पहाटे ५ ते ९ या वेळेत अभिषेक होणार असून सकाळी ११ ते १ दरम्यान पालखी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर वाघेश्वर मूर्तीचे भीमा नदीवर विधीपूर्वक स्नान होईल. सायंकाळी ७ वाजता नित्य आरती होणार असून रात्री ९.३० ते १ दरम्यान भजनी मंडळाचा जागर रंगणार आहे. सोमवारी (ता. १६) अमावस्या यात्रेनिमित्त सकाळी ६ ते १० अभिषेक, सायंकाळी ६ ते ९ शेरण्या आणि रात्री ९ ते ११ छबीना व दारूकामाचा कार्यक्रम होणार आहे. पालखी मिरवणूक आरतीनंतर रात्री ९.१५ वाजता छबीना मंदिरातून निघणार आहे. मंगळवारी (ता. १७) सकाळी ९ वाजता कै. तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. दुपारी २ वाजता निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार असून रात्री ९ वाजता ‘पाव्हणं... तुम्ही म्हणाल तसं...’ या बहारदार लावण्यांचा कार्यक्रम होणार आहे. बुधवारी (ता. १८) रात्री ९ वाजता गौतमी पाटील यांच्या लावण्यांचा विशेष कार्यक्रम यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे. कुस्तीच्या जाहिरातीनुसारच सर्व कुस्त्या पार पडतील. अतिरिक्त कुस्त्या लावल्या जाणार नाहीत, अशी स्पष्ट सूचना आयोजकांनी दिली आहे. यात्रेदरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.