कुरुळीतील मुख्य चौकात गतिरोधक बसवा
आंधळगाव, ता. १७ : कुरुळी (ता. शिरूर) गावातील मुख्य चौक धोक्याचा ‘ब्लॅक स्पॉट’ ठरत आहे. या चौकात गेल्या काही महिन्यांत अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
कुरुळीच्या मुख्य चौकातून आंधळगाव फाटा- तांदळी मार्गासह निर्वी- वडगाव रासाई हे दोन महत्त्वाचे रस्ते जातात. या मार्गावर दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ असते. परिसरात वस्ती, शाळकरी मुले, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सततची ये- जा सुरू असतानाही रस्त्यावर एकही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट जातात.
परिणामी, किरकोळ धडकांपासून गंभीर दुर्घटनांचा धोका वाढला आहे. यापूर्वी अनेक अपघात घडले असून, काही गंभीर प्रसंग थोडक्यात टळल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अपघात घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत.
याबाबत माजी उपसरपंच रणजित बोरकर, अशोक घोरपडे, भूषण बोरकर, मनोहर बोरकर यांच्यासह कुरुळी ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी लेखी निवेदन देत तातडीने गतिरोधक बसवण्याची मागणी केली आहे. गतिरोधकांसोबत वेगमर्यादा फलक, सूचनाफलक आणि रस्त्यावर स्पष्ट खुणा करण्याचीही मागणी केली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आश्वासन देण्यात आले आहे.
कुरुळी येथे गतिरोधक बसवण्याच्या संदर्भात संबंधित ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. पुढील काही दिवसांत गतिरोधक बसविण्यात येतील.
- रणजित धायगडे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिरूर
कुरुळी येथे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एखादा भीषण अपघात झाल्यानंतरच सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार आहे का?
- रणजित बोरकर, माजी उपसरपंच, कुरुळी
02832
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

