मांडवगण फराटा येथे
शिवकालीन आखाडा

मांडवगण फराटा येथे शिवकालीन आखाडा

Published on

मांडवगण फराटा, ता. २१ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मांडवगण फराटा (ता. शिरूर) आणि पंचक्रोशी अक्षरशः शिवतेजाने प्रज्वलित झाली होती. गावाच्या कानाकोपऱ्यात भगव्या पताका दिमाखात फडकत होत्या.
अखिल मांडवगण फराटा शिवजयंती उत्सव समितीने सादर केलेला दिमाखदार, भव्य आणि डोळे दिपवणारा शिवरायांचा रथ मिरवणुकीचा आत्मा ठरला.
ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाची साक्ष देणाऱ्या या रथात संत तुकाराम महाराज, तसेच विठ्ठल- रुक्मिणी यांचा साकारलेला देखावा उपस्थितांना भारावून टाकणारा होता. संत परंपरा आणि हिंदवी स्वराज्याचा विचार यांचा जाज्वल्य संगम या रथातून प्रत्ययास आला. यावेळी अवघ्या चार वर्षांच्या साजिरी नीलेश फराटे हिने सादर केलेल्या दमदार पोवाड्याने उपस्थितांची मने जिंकलीच, पण अनेकांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रूही उभे राहिले.
राजमाता जिजाऊ मासाहेब शिवकालीन मर्दानी आखाडा, मांडवगण फराटा यांच्या वतीने सादर झालेला कार्यक्रम म्हणजे शौर्याचा जिवंत इतिहासच. तलवारबाजी, ढालकाठी, ढाल-तलवार, दांडपट्टा, अग्निकाठी आणि काठीचे विविध थरारक प्रकार पाहताना उपस्थितांनी श्वास रोखला. अवघ्या तीन वर्षांच्या कावेरी शितोळे हिने सादर केलेली तलवारबाजी विशेष कौतुकास्पद ठरली. वीरा फराटे, सुहानी घोगरे, मनस्वी नलगे यांनी पारंपरिक वाद्यावर लाठीकाठी सादर केली. कादंबरी फराटे, साक्षी शिंदे, आराध्या भडांगे, मधुरा चांदगुडे, समीक्षा फराटे, वैष्णवी दरेकर, वैजयंती गवळी, साक्षी दीक्षित, अनुष्का राऊत, वेदिका राऊत, सानिका दरेकर, सलोनी जगताप, आर्या वेदपाठक, आर्या मचाले, आर्या कुतवळ, आरोही सोनवणे, ज्ञानेश्वरी जाधव या तीन ते सोळा वयोगटातील मुलींनी दाखवलेले शौर्य पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या सर्व मुलींना धनश्री चेतन शितोळे यांनी प्रशिक्षण दिले. फराटवाडी येथील श्रीराम लेझीम पथकाने सादर केलेले गावठी लेझीम नृत्यही सोहळ्याला चार चांद लावणारे ठरले.

02861

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com