मांडवगणमध्ये सडलेल्या जलपर्णीमुळे दुर्गंधी
मांडवगण फराटा, ता. २७ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाढलेली जलपर्णी सडू लागल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. परिणामी आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर दोन ते अडीच फूट जाडीचा थर साचल्याने नदीचा प्रवाह मंदावला आहे.
शिरूर व दौंड तालुक्यांसाठी जीवनवाहिनी मानली जाणारी भीमा नदी गेल्या काही दिवसांपासून जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे जलपर्णी सडू लागली असून पाण्याचा रंग बदलला आहे. उग्र वासामुळे नदीकाठच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथींचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
नदीपात्रात अनेक शेतकऱ्यांचे पंप बसवलेले आहेत. मात्र जलपर्णीच्या जाड थरामुळे पाण्यात उतरणे धोकादायक ठरत आहे. पाण्यात गेल्यानंतर अंगाला खाज सुटण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. जलपर्णीने पाण्याचा पृष्ठभाग पूर्ण झाकल्याने मच्छीमारांना मासेमारी करणे कठीण झाले आहे. पाण्याला येणाऱ्या उग्र वासामुळे ग्राहक मासे खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. नदीवर धुणे धुण्यासाठी येणाऱ्या महिलांची संख्याही लक्षणीय घटली आहे.
दरम्यान, नदीपात्रातील जलपर्णीच्या थरात अडकून बाहेर पडता न आल्याने अनेक भटक्या कुत्र्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पुलाजवळ मृत प्राण्यांमुळे अधिक दुर्गंधी पसरली असून परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील जलपर्णी तातडीने यंत्रणेद्वारे हटवून पाणीसाठ्याची व्यापक स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केशव खोमणे यांनी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास आरोग्यविषयक गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
“भीमा नदीत सडलेल्या जलपर्णीच्या जाड थरामुळे जलचरांचे आयुष्य धोक्यात आले आहे. पाण्यातील प्राणवायू कमी होत असल्याने मासे व इतर जलचर मरू लागण्याची भीती आहे. त्याचबरोबर सडलेल्या जलपर्णीमुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून जलपर्णी हटवण्याची मोहीम राबवावी.”
-केशव खोमणे, ग्रामस्थ,मांडवगण फराटा ता.शिरूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

