मांडवगण बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया

मांडवगण बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाया

Published on

मांडवगण फराटा, ता. २८ : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील भीमा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर तब्बल १,०५० नवीन ढापे बसविण्यात आल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून केला होता. मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. गंजलेल्या व जीर्ण जुन्या ढाप्यांतून पाणी थेट नदीपात्रात वाहत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाही पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
शिरूर व दौंड तालुक्यातील अनेक गावांच्या शेतीसाठी हा बंधारा जीवनरेषा मानला जातो. सुमारे तीन महिन्यांपूर्वी नवीन ढापे बसविण्याचे काम करण्यात आले. मात्र, आवश्यक संख्येत व वेळेत ढापे उपलब्ध नसल्याने काही ठिकाणी जुनेच ढापे कायम ठेवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच काही ठिकाणी जुने ढापे पूर्णतः काढून न टाकता त्यावरच नवीन ढापे बसविण्यात आल्याने सांध्यांमधून व गंजलेल्या भागांतून मोठ्या प्रमाणात पाणीगळती सुरू आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर साठवलेले पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असताना लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. गळतीमुळे सिंचनासाठी उपलब्ध होणारा पाणीसाठा कमी होत असून त्याचा थेट परिणाम पिकांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
ढापे बसविताना निकामी भाग पूर्णतः काढून टाकणे अपेक्षित असताना तात्पुरत्या स्वरूपाचे काम केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. काम पूर्णत्वास गेल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात गळती थांबलेली नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. या पार्श्वभूमीवर बंधाऱ्याची तातडीने तांत्रिक तपासणी करून सर्व जुने ढापे बदलणे, सांधे मजबूत करणे आणि कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकरी गणेश फराटे, वैभव फराटे, सतीश फराटे, संपत फराटे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.


मांडवगण फराटा येथील बंधाऱ्याला नवीन ढापे बसवूनही त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरूच आहे. पाटबंधारे विभागाने त्वरित पाणी गळती रोखली नाही तर भविष्यात या परिसरात गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना करून पाणी गळती थांबवणे अत्यावश्यक आहे.
- राजेंद्र दरेकर, शेतकरी, मांडवगण फराटा ता.शिरूर

मांडवगण फराटा–कानगाव बंधाऱ्यातून होत असलेल्या पाणीगळतीची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून गळती रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्यात येतील.
- पृथ्वीराज फाळके, अधीक्षक अभियंता, जलसंपदा विभाग पुणे

02900

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com