वडगाव रासाईत शेतकऱ्यांच्या संतापाचा स्फोट
मांडवगण फराटा, ता.४ : वडगाव रासाई (ता.शिरूर)येथील शेलारवाडी येथे घोड प्रकल्पाच्या पाण्याच्या प्रश्नावर बुधवारी (ता.४) शेतकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला. शेतकऱ्यांनी अर्धनग्न होऊन कालव्यात उतरून तीव्र आंदोलन केले. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सुरू असलेल्या आवर्तनाचा काहीही फायदा होणार नसल्याचा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले. यंदाच्या आवर्तनात घोड प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
घोड प्रकल्पाच्या उजव्या कालव्यासाठी रविवारी (ता.१)आवर्तन सुरू करण्यात आले; मात्र चार दिवस उलटूनही टेलच्या कुरुळीपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्यामुळे शेवटच्या टोकावरील शेतकरी हवालदिल झाले आहेत. विशेष म्हणजे वडगाव रासाई येथील शेतकरी थेट कालव्यातून पाणी उपसा करत नाहीत. मात्र, कुरुळीकडे जाणाऱ्या पाण्यामुळे येथील विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी वाढण्यास मोठा फायदा होतो. तरीही दरवर्षी पाणीपट्टी भरूनही उच्च दाबाने पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलनादरम्यान घोड प्रकल्प प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. योग्य दाबाने पाणी सोडून संपूर्ण कालव्याची प्रत्यक्ष पाहणी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, असा ठाम इशारा शेतकऱ्यांनी दिला.
गतवर्षी कुरुळीपर्यंत पाणी पोहोचल्यानंतर प्रशासनाने अचानक पाणी बंद केल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला. यंदा नियमित व पुरेशा दाबाने पाणी सोडावे, अशी मागणी वारंवार करूनही अधिकारी घटनास्थळी न आल्याने संताप अधिकच भडकला. घोड धरणाचे कनिष्ठ अभियंता महेश शिंदे व शाखाधिकारी महेश काळे यांना कालव्याची पाहणी करण्याची विनंती करण्यात आली होती; परंतु दुपारपर्यंत कोणीही हजर न राहिल्याने गोविंद शेलार, योगेश शेलार, ऋषिकेश परभाणे, अशोक शेलार, अमोल ढवळे, तुषार शेलार, सागर शेलार, संतोष सोनवणे आदी शेतकऱ्यांनी थेट कालव्यात उतरून निषेध नोंदवला.
आमच्या हक्काचे पाणी जाणीवपूर्वक अडवले जात आहे. काही ठिकाणी पैशांच्या जोरावर पाणी चोरी होत आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही, असा गंभीर आरोप आंदोलकांनी केला. पाणी चोरीला मूकसंमती देणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन व सखोल चौकशीची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांची पिके जळत असताना अधिकारी जबाबदारी झटकत आहेत. मोजक्या शेतकऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही. आम्हाला न्याय न मिळाल्यास आंदोलन आणखी उग्र व व्यापक करू, असा इशारा देण्यात आला.
यावेळी अतुल ढवळे, अजित शेलार, परसराम परभाणे, शुभम ढवळे, वैभव ढवळे, संग्राम शेलार, रावसाहेब शेलार, कैलास भोसले, किरण शेलार, अमोल शेलार, बाळासाहेब ढवळे, सचिन ढवळे, शशिकांत शेलार, भानुदास बोत्रे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाची मदत घेऊन पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर ताबडतोब कारवाई करण्यात येईल.कोणालाही नियमबाह्य पाणी उपसा करू दिला जाणार नाही.तसेच शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांना उच्च दाबाने व नियमित पाणीपुरवठा मिळेल.
- महेश शिंदे, कनिष्ठ अभियंता, घोड धरण
02910
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

