

मांडवगण फराटा, ता. ४ : तांदळी (ता. शिरूर) येथील न्हावरे- बीड या महामार्गावरील अपूर्ण व रखडलेल्या कामांमुळे ग्रामस्थांचा संताप अखेर उफाळून आला. वारंवार पाठपुरावा करूनही कामे पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांनी बुधवारी (ता. ४) सकाळी १० वाजता रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पाच वर्षांपूर्वी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, आजही अनेक अत्यावश्यक कामे प्रलंबित आहेत. रबरी स्पीड ब्रेकर बसविणे, बंद असलेल्या पथदिवे सुरू करणे, धोकादायक वळणांवर गार्डरेल बसविणे, मुख्य चौकात वाहतूक नियंत्रक यंत्रणा उभारणे, दोन्ही बाजूंना फुटपाथलगत लोखंडी रेलिंग बसविणे, तसेच रस्त्याच्या बाजूची झुडपे हटविणे, या मागण्या वारंवार करूनही संबंधित विभागाकडून कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.
विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेअभावी अपघातांचा धोका वाढला असून, शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी यांना रोजचा प्रवास जीव मुठीत धरून करावा लागत आहे. आंदोलनाची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते, अमोल गवळी, अशोक शिंदे, भाऊसाहेब टेंगले, किशोर वाघ, अमोल माने आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ग्रामस्थांशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी अजित गायके घटनास्थळी पोहोचले. त्यांना ग्रामस्थांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.
आम्ही अनेकदा तोंडी व लेखी मागण्या केल्या. मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळेच रास्ता रोकोसारखा तीव्र मार्ग स्वीकारावा लागला, असे घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष कळसकर यांनी सांगितले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
दरम्यान, गायके यांनी येत्या १० दिवसांत प्रलंबित कामांवर कार्यवाही करून परिस्थिती सुधारण्याचा शब्द दिला. त्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र, दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र गदादे, सागर फराटे, गणेश गदादे, आश्रत गदादे, काळूराम खोरे, संजय कळसकर, दिलीप कळसकर, लक्ष्मण कळसकर, अप्पासाहेब कळसकर, नामदेव गदादे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.