शेळी गटासाठी अर्ज करण्याचे एकल महिलांना आवाहन
मांडवगण फराटा, ता. ६ : पंचायत समिती शिरूरच्या उपकर निधीतून पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात एकल महिलांसाठी ७५ टक्के अनुदानावर दोन शेळ्यांचा गट वाटप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी पात्र एकल महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय, पंचायत समिती शिरूर यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत तालुक्यातील १६ एकल महिलांना लाभ देण्यात येणार आहे. उस्मानाबादी किंवा संगमनेरी जातीच्या पैदासक्षम दोन शेळ्यांच्या खरेदीसाठी प्रती लाभार्थी १२ हजार ५०० रुपये अनुदान दिले जाणार आहे. दोन शेळ्यांच्या खरेदीसाठी अपेक्षित खर्च १६ हजार रुपये असून त्यावर ७५ टक्के म्हणजे १२ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय दोन वर्षांच्या विम्यासाठी ५०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. विमा व इतर आनुषंगिक खर्च लाभार्थ्याने स्वतः करायचा आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिला विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत किंवा अनाथ अशा स्वरूपातील एकल महिला असावी. अर्जदाराचे वय कमाल ६५ वर्षे असावे. तसेच १ मे २००१नंतर तिसरे हयात अपत्य नसावे. अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसावा तसेच कुटुंब निर्वाह निवृत्तीवेतन मिळत नसावे, अशी अट आहे.
अर्जासोबत आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, अपत्य दाखला, ग्रामपंचायत अधिकारी व अंगणवाडी सेविका यांचे एकल महिलेचे प्रमाणपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स प्रत तसेच शासकीय/निमशासकीय सेवेत नसल्याचे व निवृत्तीवेतन मिळत नसल्याचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जांमधून पात्र अर्जांची निवड समितीसमोर सोडत पद्धतीने १६ लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. लाभार्थ्यांनी बाजारातून शेळ्यांची खरेदी करून बाजार समितीची पावती व विमा पॉलिसी सादर केल्यानंतर डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. इच्छुक पात्र महिलांनी विहित नमुन्यातील अर्ज पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती शिरूर येथे १३ मार्च २०२६पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

