

आंधळगाव, ता. २८ : सादलगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रवेशद्वारावर शनिवारी (ता. २८)सकाळी सातच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीती पसरली आहे. वारंवार तक्रारी करूनही वनविभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी बिबट्याला तातडीने जेरबंद करण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिनाभरापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. शनिवारी शाळा भरण्याच्या वेळीच बिबट्या दिसल्याने विद्यार्थी घाबरले असून, याचा परिणाम शाळेतील उपस्थितीवर झाला आहे. शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांनी वनविभागाला निवेदन देऊन तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. शाळा परिसरात उसाचे क्षेत्र मोठे असल्याने बिबट्याला लपण्यास जागा मिळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
"शाळेच्या परिसरात सातत्याने बिबट्या दिसत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाने तातडीने बंदोबस्त करावा," अशी मागणी मुख्याध्यापक सुनील साठे यांनी केली आहे. दरम्यान, वनविभागाच्या विलंबामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.