

आंधळगाव, ता. १ : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात बुधवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजता अचानक बदललेल्या हवामानाने थैमान घालत विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारांच्या वर्षावात पावसाने जोरदार हजेरी लावली. निर्वी, आंधळगाव, नागरगाव, कोळगाव डोळस, रांजणगाव सांडस या भागांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. वडगाव रासाई, सादलगाव, कुरुळी परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
दुपारी चार वाजल्यापासूनच परिसरात पावसाळ्यासारखे ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्याचा वेग अचानक वाढला आणि त्याचवेळी विजांचा कडकडाट सुरू झाला. काही क्षणांतच गारांच्या वर्षावासह पावसाने जोर धरत परिसराला अक्षरशः झोडपून काढले. निर्वी गावात ठिकठिकाणी गारांचा मोठा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे.
या पावसाचा सर्वाधिक फटका सध्या काढणीला आलेल्या पिकांना बसला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा काढणी सुरू असताना शेतात पडून असलेला कांदा पावसात भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच बाजारात कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसताना या पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. दुसरीकडे, ऊस रसवंतीसाठी जात असल्याने चांगला बाजारभाव मिळत असताना वादळी वाऱ्याने ऊस पीक भुईसपाट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातील तयार उत्पन्नावरच घाला बसला आहे. याशिवाय गहू, भाजीपाला आणि चारा पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आंबा पिकालाही मोठा फटका बसला आहे.
शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निर्वीचे माजी सरपंच तात्यासाहेब सोनवणे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.