

मांडवगण फराटा, ता. १५ : शिरूर-श्रीगोंदा तालुक्यांची जीवनवाहिनी असलेली घोड नदी आटण्याच्या उंबरठ्यावर आहे. नदीपात्रात अवघ्या पाच दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. केवळ खोल खड्ड्यांत पाणी साचलेले असून उर्वरित पात्र पूर्णपणे कोरडे पडल्याने परिसरात भीषण स्थिती निर्माण झाली आहे.
शिरसगाव काटा ते इनामगाव, तांदळीपर्यंतचा पट्टा पूर्णपणे कोरडा पडला आहे. पिण्याचे पाणी व शेती या दोन्ही गरजांसाठी नदीवर अवलंबून असलेल्या शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील सुमारे दहा गावांवर पाणीटंचाईचे गंभीर सावट दाटले आहे. या पार्श्वभूमीवर घोडगंगा कारखान्याचे संचालक सचिन मचाले, पोलिस पाटील नानासाहेब घाडगे, राजाराम मचाले व ज्ञानदेव नलगे यांनी प्रशासनाने विलंब न लावता तातडीने नदीपात्रात पाणी सोडावे, अशी मागणी केली आहे.
शिरूर तालुक्यातील चिंचणी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी तसेच श्रीगोंदा तालुक्यातील बोरी, हंगेवाडी, वांगदरी, काष्टी, सांगवी या गावांची तहान भागवणारी घोड नदी आज वाळूच्या ढिगाऱ्यांत हरवली आहे.
अशी आहे स्थिती
- नदीपात्रात जागोजागी मोठमोठे तडे
- अनेक ठिकाणी कृषीपंप उघड्यावर
- पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई
पाणी उचल यंत्रणा निष्क्रिय
शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभारलेली पाणी उचल यंत्रणा निष्क्रिय ठरली आहे. इनामगाव परिसरात काही ठिकाणी किरकोळ पाणीसाठा शिल्लक असला तरी शिरसगाव काटा ते पिंपळसुटी दरम्यानचा पट्टा पूर्णपणे कोरडा पडला आहे.
गेल्या दोन दिवसांत परिस्थिती अधिकच गंभीर बनली असून पिण्याच्या पाण्याची टंचाईही तीव्र होऊ लागली आहे. विविध गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर ताण वाढत असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ठोस निर्णयाअभावी नागरिकांत संभ्रम
प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय जाहीर न झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. जीवनवाहिनीच आटल्याने ग्रामीण भागातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून तातडीने उपाययोजना न झाल्यास पाणीटंचाईचे संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
03067
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.