
‘ओळख ज्ञानेश्वरी’च्या पहिल्या पर्वाची सांगता
आळंदी, ता. २ ः मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच संत विचाराच्या अध्यात्माची ओळख व गोडी निर्माण करण्याच्या उद्देशाने आळंदीतील ज्ञानेश्वर विद्यालयात वर्षभरापूर्वी सुरू केलेला ओळख ज्ञानेश्वरीची या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाची सांगता उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सायकल वाटप करून झाली. शालेय अभ्यासक्रमाबरोबरच संत विचारांचा अभ्यास देणाऱ्या या आळंदी पॅटर्नचे कौतुक मात्र सर्वच स्तरावर होत असल्याचे चित्र आहे.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था व श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यास एक आदर्श व्यक्ती घडविण्याच्या उद्देशाने ‘ओळख श्री ज्ञानेश्वरीची’ एक संस्कारक्षम उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीचे ज्ञानामृत दिले जात आहे. मागील वर्षीपासून या अभ्यासक्रमास विद्यालयाने स्वयंस्फूर्तीने सुरूवात केली. गेली वर्षभर विद्यार्थ्यांना दर रविवारी ज्ञानेश्वरीच्या पाठ शिकवण्याचे काम प्रा. भागवत महाराज साळुंके, उमेश महाराज बागडे, सुभाष महाराज गेटे व श्रीधर घुंडरे यांनी केले. ज्ञानेश्वरी ग्रंथावर आधारित विद्यार्थ्यांकरिता जो अभ्यासक्रम तयार केला त्यावर आधारित परीक्षा घेण्यात आली. ज्ञानेश्वरीतील अठरा अध्यायांना अनुसरून अठरा विद्यार्थ्यांना गुणवत्ता क्रमांक देण्यात आले. प्रथम पुनम जोरी व रोहन सोनवणे या द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना सायकल वाटप केले.
या उपक्रमासाठी लांब अंतरावरून येणाऱ्या बजरंग नागरगोजे याला सायकल देण्यात आली. यावेळी अभिनेता वरुण भागवत, गायक अवधूत गांधी, अॅड विलास काटे यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नारायण महाराज जाधव, साहित्यिक राजेश बाद्याले संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगांवकर, विश्वस्त प्रकाश काळे, सचिव अजित वडगांवकर, श्रीधर सरनाईक, सदस्य अनिल वडगांवकर, विठ्ठल शिंदे, आरिफ शेख, दिनेश कुऱ्हाडे, संस्थेचे व चरित्र समितीचे सर्व सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे आदी उपस्थित होते.
उद्योगपती नारायण गावडे यांनी सायकली दिल्या. तिसऱ्या क्रमांकातील श्रुतिका लवंगे आणि चौथ्या क्रमांकाच्या सूरज वैरागड या विद्यार्थ्यांना आळंदीतील प्राजक्ता हरपळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ वर्षभराचा सर्व शैक्षणिक खर्च देण्याचे अभिवचन दिले. इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विश्वस्त प्रकाश काळे यांच्या वतीने दोन शालेय गणवेश, प्राजक्ता हरपळे यांच्याकडून स्कूल बॅग, शिक्षिका हेमांगी कारंजकर यांच्या वतीने टिफीन देऊन सन्मानित करण्यात आले. श्रीधर घुंडरे यांच्यावतीने सार्थ ज्ञानेश्वरी देण्यात आली.