आळंदीतील अतिक्रमण ठरले जीवघेणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदीतील अतिक्रमण ठरले जीवघेणे
आळंदीतील अतिक्रमण ठरले जीवघेणे

आळंदीतील अतिक्रमण ठरले जीवघेणे

sakal_logo
By

आळंदी, ता. ६ : आंब्याच्या झाडावरील कैरी काढण्याच्या प्रयत्नात असताना हात निसटल्याने एकवीस वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना आळंदीत रविवारी (ता. ५) सायंकाळी घडली. उज्ज्वला नामदेव झाडे (वय २१, आळंदी देवाची), असे मृत तरुणीचे नाव आहे. दरम्यान, आळंदी ग्रामिण रूग्णालयाच्या दारात रस्त्यावरील असलेल्या भाजीविक्रेते आणि वाहनांच्या बेकायदा पार्किंगमुळे रूग्णवाहिकेस रूग्णालयात जाण्यासाठी रस्ता मिळाला नाही. परिणामी उपचारापूर्वीच तिचे निधन झाले. ग्रामिण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्‍यांनीही यास दुजोरा दिला.
वडगाव रस्ता येथे राहणाऱ्या उज्ज्वल ही आंब्याच्या झाडावरील कैरी काढण्याचा प्रयत्न करत होती. त्यावेळी हात निसटल्याने ती जमिनीवर पडली. त्यामुळे तिला गंभीर इजा झाली. तिला नागरिकांनी रूग्णवाहिकेद्वारे आळंदी ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, ग्रामिण रूग्णालयाची वाट भाजी विक्रेते आणि वाहनांच्या अतिक्रमणाने अडवली असल्याने रुग्णवाहिका रूग्णालयात पोहोचण्यास थोडा उशीर झाला. यावेळी आळंदी पोलिसांनी येऊन सर्व वाहने काढून रूग्णवाहिकेस वाट मोकळी करून दिली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. तेथील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी ती मृत असल्याचे सांगितले. अपघाती मृत्यूबाबत आळंदी पोलिस अधिक तपास करत आहे. झाडे या एका खासगी कंपनीत काम करत होत्या. संप्रदायिकतेची आवड असल्याने त्या गायनाचे शिक्षणही आळंदीत राहून घेत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे वारकरी संप्रदाय तसेच आळंदीकरांनी हळहळ व्यक्त केली.
याबाबत ग्रामिण रुग्णालयातील डॉ. शुभांगी नरवडे यांनी सांगितले की, आम्ही वॉर्डमधेच होतो. रुग्णवाहिकेचा आवाज आल्यावर बाहेर आलो. मुलीला सीपीआर दिला. रूग्णालयात आली तेव्हा जगण्याची खात्री कमी होती. ज्यांनी तरुणीला रुग्णवाहिकेत आणले, त्यांनी श्वास सुरू असल्याचे सांगितले. मात्र, रुग्णवाहिकेत येण्यास रस्त्यावरील गर्दीमुळे उशीर झाला. पोलिसांनी गर्दी हटविण्यास चांगली मदत केली. मात्र, मार जास्त लागल्याने रक्तस्राव जास्त झाला होता. तर रस्त्यावर गर्दीमुळे रुग्णवाहिका वेळेत पोचली नाही.
ग्रामिण रूग्णालयाच्या दरवाजात असलेल्या बेकायदा भाजीमंडईबाबत रूग्णालय आणि पोलिसांनी अनेकदा पालिकेला पत्रे दिली. मात्र, पालिका मुख्याधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करतात. राजकीय दबावामुळे अतिक्रमण काढले जात नाही. परिणामी पोलिस, ग्रामिण रुग्णालयाला कोंडीचा ताप होतो. तर, अधूनमधून रूग्ण नेताना अडचण होते. त्यामुळे बेकायदा भाजिविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, पालिका प्रशानाविरोधात नागरिकांची तीव्र नाराजी निर्माण झाली.

मैदानावर भाजी मंडई
रुग्णवाहिका रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास उशीर झाल्याने अपघात झालेल्या मुलीस वेळेत उपचार झाले नाहीत. आळंदीकरांच्या संतप्त भावना पाहून पोलिस ठाण्यात सोमवारी बैठक झाली. त्यानंतर पालिकेच्या शाळेच्या मैदानात भाजी मंडई हलविण्याचे प्रसिद्धी पत्रक पालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी काढले. मात्र, तरीही मैदानावर भाजी मंडई भरवली. शहरातील मुलांचे एकमेव मैदान नसेल तर खेळायचे कुठे? हा दुसरा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.