दिंडीसोबत येताना ताट-वाटी आणण्याचे वारकऱ्यांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिंडीसोबत येताना ताट-वाटी 
आणण्याचे वारकऱ्यांना आवाहन
दिंडीसोबत येताना ताट-वाटी आणण्याचे वारकऱ्यांना आवाहन

दिंडीसोबत येताना ताट-वाटी आणण्याचे वारकऱ्यांना आवाहन

sakal_logo
By

आळंदी, ता. १० ः वारी काळात प्लॅस्टिक, थर्माकोल तसेच पानाच्या पत्रावळ्या आणि द्रोणचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. वापर झाल्यानंतर हे वापरलेले पत्रावळ्या, द्रोण इतस्ततः उडतात. त्यामुळे प्रदूषण होते. पर्यावरण सांभाळण्यासाठी यंदाच्या वारीत वारकऱ्यांनी दिंडीसोबत येताना घरूनच ताट वाटी सोबत आणण्याचे आवाहन माऊलींच्या पालखी सोहळ्यातील एका दिंडीने केले आहे.
हरित वारी पर्यावरणपूरक वारी हा संदेश वारकरी गेली काही वर्षापासून स्वतःहून पाळत आहेत. शासनाच्या आवाहनाला नेहमीच प्रतिसाद देत असतात. यंदाही माउलींच्या सोहळ्यातील भीमाशंकर येथील हिंदू महादेव कोळी समाज दिंडी सोहळा संघ रथामागे चालणारी दिंडी क्रमांक १५९ या दिंडीने सहभागी वारकऱ्यांसाठी आवाहन केले आहे. सोहळ्यामध्ये लाखांच्या संख्येने समाज चालत असतो. अनेक दिंड्या सहभागी होतात. पालखी मार्गावरील दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी अनेकदा प्लॅस्टिक, थर्माकोलच्या पत्रावळी वापरल्या जातात. काही पानाच्याही पत्रावळ्या वापरतात. मात्र, जेवण झाल्यानंतर याच पत्रावळ्या हवेमुळे इकडे तिकडे पसरतात. आणि त्या ठिकाणचा परिसर अस्वच्छ दिसू लागतो. जनावरेही अनेकदा या पत्रावळ्या खातात. आपण केलेल्या एका चुकीमुळे पर्यावरणाची हानी होते. हे टाळण्यासाठी आणि प्रदूषण विरहित वारी करण्यासाठी पुढाकार म्हणून भिमाशंकर इथल्या दिंडीने दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सोबत ताट वाटी आणण्याचे आवाहन केले आहे.
माउलींच्या सोहळ्यात अनेक दिंड्यांकडे ताट वाट्या स्वतःच्याच आहेत. तर काही वर्षांपूर्वी आळंदीतील चोपदार फाउंडेशननेही काही दिंड्यांना ताट वाटी मोफत दिली होती. यामागचा उद्देश केवळ प्रदूषण टाळणे हाच होता. तीच परंपरा आता दिंडी क्रमांक १५९ ने सुरू ठेवली आहे.