

आळंदी, ता.२७ : समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्यावर सोन्यांचे आभूषण आणि गुलाबांच्या पुष्पात गुंफलेला मोरपिसांचा घातलेला हार.....असे कृष्ण रूपातील मनमोहक सजविलेले माउलींची समाधी डोळ्यात साठवीत भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांनी केलेल्या टाळ मृदंगाच्या गजरात आणि माउलीनामाचा अखंड जयघोषात माउलींच्या संजीवन समाधीवर सोमवारी (२६) मध्यरात्री बारा वाजता गुलाबांची पुष्पवृष्टी, पेढे, सुंठवडा वाटून आळंदीतील देऊळवाड्यात माऊली जन्मोत्सव साजरा केला. माउली माउलीचा गजर आणि घंटानादाने परिसर मध्यरात्रीनंतर दुमदुमून गेला.
आळंदी देवस्थानच्यावतीने हरिनाम सप्ताहाचे आयोजन परंपरेने केले होते. सायंकाळी नामदेवशास्त्री यांचे कीर्तन झाले. दरम्यान, काल रात्री देऊळ वाड्यात धुपारती झाल्यानंतर नऊ ते साडे नऊ हरिपाठ झाला. त्यानंतर तयारी सुरू झाली ती माउलीजन्माची.
माऊली जन्माचा सोहळा समीप आल्याने आळंदीकर भाविकांना दरवाजातून मंदिरात सोडण्यास सुरुवात केली. दहा ते बारा या वेळेत पंखा मंडपात मोझे कुटूंबियांच्यावतीने माऊली जन्माचे कीर्तन लक्ष्मण चोरट यांनी केले. त्याचवेळी वीणा मंडपात आळंदीकर ग्रामस्थांचे भजन सुरू होते. दरम्यान समाधी गाभारा मंडपात, साडे अकरा ते बारा च्या दरम्यान प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते कृष्ण जन्मानिमित्त गोकूळ पूजन झाले. त्यानंतर वेध लागले ते माउली जन्माचे. ब्रम्हवृंदानी मुख्य समाधी गाभारा स्वच्छ केला आणि समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून अत्तराचा दर्प देत समाधी सजविली.
देवस्थानच्यावतीने मानकऱ्यांना नारळप्रसाद वाटप केला. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा मालक ऋषिकेश आरफळकर, रामभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांची उपस्थिती होती. माउली जन्माच्या सोहळ्यानंतर जागराचा कार्यक्रम सुरू झाला. दरम्यान, मंगळवारी (ता.२७) सकाळी वीणा मंडपात बापूसाहेब मोरे यांचे काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.
घंटानादासनंतर पेढे, सुंठवड्याचे वाटप
आकर्षक मेखला, फुलांच्या माळांनी तयार केलेला हार, सजविलेल्या माउलींच्या समाधीवर लक्ष वेधून घेत होता. माउलींचे हे मनमोहक रूप भाविकांनी नयनात साठविले. जर्बेरा आणि सुगंधी मोगऱ्यांच्या फुलांची सजावट संपूर्ण समाधी मंदिराला केली होती. दरम्यान, पंखा मंडपात चोरट महाराजांनी ठिक बाराच्या दरम्यान कीर्तनात माउली जन्माचे वर्णन करताच भाविकांनी समाधीवर पुष्पवृष्टी करत माउली नामाचा जयघोष केला. त्यानंतर घंटानाद केला आणि पेढे, सुंठवडा वाटण्यात आला.
04845
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.