‘जागतिक सहिष्णुता सप्ताहा’चे आळंदी येथे आयोजन
आळंदी, ता. १९ : विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी आणि श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती यांच्यावतीने शुक्रवार (ता. २२) पासून ते गुरुवार (ता. २८) दरम्यान तत्त्वज्ञ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त दरवर्षी प्रमाणेच ‘जागतिक सहिष्णुता सप्ताहा’चे आळंदी येथे आयोजन करण्यात आले आहे.
कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त होत असलेल्या या सप्ताहात ‘श्रीसंत ज्ञानेश्वर-तुकाराम ज्ञानतीर्थ’, विश्वरूप दर्शन मंच, श्रीक्षेत्र आळंदी येथे भजन, कीर्तन, प्रवचन यांसह लोकप्रबोधनपर विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत.
या सप्ताहाचे उद्घाटन शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी होणार आहे. संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे माजी कुलपती पद्मभूषण डॉ. विजय भटकर, आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थचे अध्यक्ष मारुती महाराज कुऱ्हेकर, श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष किसन महाराज साखरे, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, आळंदी देवस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, देहू येथील तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, श्री विठ्ठल-रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांची प्रमुख उपस्थिती आहेत.
याबाबत माहिती देताना, आळंदी देहू परिसर विकास समितीचे समन्वयक डॉ. सुनील कराड आणि प्रा. स्वाती चाटे (कराड)
यांनी सांगितले, ‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती’ या स्वामी विवेकानंदांच्या वचनानुसार सुदृढ, निकोप आणि सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी सहिष्णुता सप्ताहाचे आयोजन केले जाते. बंधुत्व, मानवी हक्क, लोकशाही, सर्वधर्मसमभाव, विज्ञान अध्यात्माचा समन्वय आणि सहिष्णुता अशा विविध विषयांवरील लोकशिक्षणाचा व समाजप्रबोधनाचा हा सोहळा आहे.
दरम्यान या सोहळ्यात सकाळी साडे नऊ ते साडेबारा वाजेपर्यंत उद्धव महाराज पाटील रमजानपूरकर, प्रकाश महाराज बोधले, शिवशंभू चरित्र व्याख्याते धर्मराज महाराज हांडे, नारायण महाराज उत्तरेश्वर-पिंपरीकर आणि अच्युत महाराज दस्तापूरकर यांची कीर्तने होणार आहेत. यावेळी हरिपाठ व इंद्रायणी मातेची आरती होईल.
यानिमित्ताने दररोज संध्याकाळी सहा ते सात या वेळेत व्याख्याने व प्रवचन होतील. यामध्ये सुफी संत व इस्लाम धर्माचे अभ्यासक लतीफ पटेल, नाशिक येथील भागवताचार्य डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे, संत साहित्याचे अभ्यासक रविदास महाराज शिरसाठ, डॉ. तुकाराम महाराज गरुड ठाकुरबुवा दैठणकर, राजस्थान बासवाडा येथील महामंडलेश्वर महर्षी उत्तम स्वामी आणि बापूसाहेब मारे देहूकर यांचे प्रवचन होतील.
दररोज संध्याकाळी सव्वा सात ते रात्री नऊ या वेळेत अर्जुन महाराज लाड, हरिहर महाराज दिवेगांवकर, रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक किसनमहाराज साखरे आणि चिन्मय महाराज सातारकर यांची कीर्तने आयोजित केली आहेत.
रात्री सव्वा नऊ ते साडे अकराच्या सत्रात विश्वशांती संगीत कला अकादमी राजबाग, पुणे येथील शिक्षक व विद्यार्थी यांचा विश्वशांती दर्शन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, श्रुती पाटील यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम, राधाकृष्ण गरड गुरुजी यांचा सांप्रदायिक अभंग गवळणीचा कार्यक्रम, मानसी वझे प्रस्तुत अभंग वेध, हा परंपरेतील नवतेचा एक नृत्यात्मक शोध असेल. डॉ. आशिष रानडे यांचा संतवाणी हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
संतश्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने गुरुवारी (ता. २८) सकाळी दहा वाजता डॉ. सुदाम पानेगावकर यांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर घंटानाद, महाप्रसाद होऊन या सप्ताहाची सांगता होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

