आळंदीतील संस्थांवर वचक कोण ठेवणार?

आळंदीतील संस्थांवर वचक कोण ठेवणार?
Published on

जे खळांची व्यंकटी सांडो ।
तयां सत्कर्मा रती वाढो ।।
भूतां परस्परें जडो।
मैत्र जिवाचें ।।

संत ज्ञानदेवांनी ही पसायनदानरूपी प्रार्थना ईश्‍वराकडे मागितली. मात्र, लहान मुलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या एखाद-दुसऱ्या घटनेमुळे देवाच्या आळंदीत खलप्रवृत्तीची बीजे रुजू लागण्यापूर्वीच त्याची पाळेमुळे खणण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा प्रकरणांमुळे आळंदी शहराची आणि वारकरी संप्रदायाची नाहक बदनामी होत आहे. ती रोखण्यासाठी आता संस्था सुरू करणाऱ्यांसाठी नियमावली, आचारसंहिता बनविण्याची गरज निर्माण झाला आहे.
- विलास काटे

तीन दिवसांपूर्वी महेश मिसाळ नावाच्या व्यक्तीने दोन बालकांचे लैंगिक शोषण केले. या घटनेने आळंदीकर ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला. आळंदीत सध्या आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या दीडशेपेक्षा अधिक संस्था अधिकृतपणे सुरू आहेत. अनेक जण संस्थांच्या माध्यमातून उदरनिर्वाह करत आहेत. काहींनी निव्वळ धंदा म्हणूनच संस्था सुरू केल्या. त्यामुळे खोलीत पुरेशा प्रकाशाची सोय नाही. जेवणाचा दर्जा चांगला नाही. अंघोळीसाठी इंद्रायणीसारख्या प्रदूषित नदीत विद्यार्थ्यांना पाठवले जाते. बहुतांश संस्था या धर्मशाळेत असल्याने स्वच्छतागृहांच्या सुविधाही मुलांच्या संख्येच्या प्रमाणात कमी आहेत. काहींनी तर गुंठाभर जागेतच संस्था सुरू केल्या आहेत. शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण मिळत असल्याने मुलांना आळंदीत पाठवले जाते. आज ....दहा हजारांहून अधिक विद्यार्थी विविध संस्थेत आध्यात्मिक शिक्षणाबरोबरच शालेय शिक्षण घेत आहेत. मात्र, सुविधांकडे काणाडोळा झाल्याचे चित्र आहे. त्यातूनच महेश मिसाळसारखा दुराचारी मुलांचे शोषण करू लागला. आतापर्यंत अशा घटना वारंवार होऊ लागल्याने संस्थाचालकांविरोधात काहीसा मतप्रवाह जाऊ लागला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुले आई-वडिलांपासून केवळ महाराजांच्या भरवशावर येऊन राहतात. मात्र, अशा घटनांनी त्यांच्या विश्‍वासाला तडा जातो.

आध्यात्मिक शिक्षणाची पंढरी
विद्यार्थ्यांना आळंदीत हॉर्मोनियम, तबला, टाळ, मृदंगवादन, गायन तसेच गीता, हरिपाठ शिकवला जातो. एका विद्यार्थ्याकडून १५ हजार ते ३० हजार असा खर्च निवास आणि जेवणासह आकारला जातो. यामुळे हजारो वारकरी घडविणारी कार्यशाळा म्हणून आळंदी नावारूपाला आली. यातून संस्कारक्षम शिक्षण मिळत असल्याने पालकांचाही ओढा पाल्याला आळंदीकडे पाठविण्याकडे वाढला. आजवर लाखो विद्यार्थी आळंदीत शिकून कीर्तनकार, प्रवचनकार, पखवाज वादक, गायक झाले. ही जमेची बाजू असली, तरी मिसाळसारख्या प्रवृत्तीच्या लोकांमुळे वारकरी संप्रदाय, आळंदी नाहक बदनाम होत आहे. हे टाळण्यासाठी संस्थाचालकांवर बंधने आणून आचारसंहिता बनविण्यासाठी बैठक घेण्याची मागणी आळंदीतून होत आहे.

संस्थाचालक स्वत: दर्जेदार शिक्षण संस्थेत शिकलेला पाहिजे. त्याचे वय किमान ४० असावे. सध्या २२-२५ वर्षांची मुले संस्था काढत आहेत. याला आळा घालण्याची गरज आहे. संस्थाचालक संस्कारक्षम आणि चारित्रसंपन्न हवा. त्याला ज्ञानेश्‍वरी, गाथा, गीता, विचारसागरचा अभ्यास हवा, अन्यथा अशा घटनांनी गेल्या दहा वर्षांत संप्रदाय आणि आळंदीची बदनामी होत आहे.
- अशोक महाराज शेवाळे, संस्थापक, सिद्धबेट वारकरी शिक्षण संस्था, आळंदी (ता. खेड)

सध्या कुणी कुणाला सांगावे आणि कुणी कुणाचे ऐकावे हा प्रश्‍न उपस्थित होत आहे. संप्रदायातील ज्येष्ठ, ग्रामस्थांनी संयुक्त बैठक घेत आचारसंहिता केली पाहिजे. विशेषतः प्रशासनाचेही लक्ष हवे. विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी हवी. शैक्षणिक आणि आध्यात्मिक दर्जा संस्था काढताना जपणे गरजेचे आहे. विद्यार्थ्याची शारिरिक, मानसिक, आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे.
- पुरुषोत्तम महाराज पाटील, कीर्तनकार

‘संस्थाचालकांनी स्वत:हून बंधने घालून घ्यावीत’
आळंदी शहर पोलिसांना याबाबत विचारले असता, वारकरी संप्रदाय असल्यामुळे अशा घटना घडू नयेत, यासाठी सर्वांनी कायदा पाळणे गरजेचे आहे. लवकरच पोलिस प्रशासनाच्या पुढाकाराने पोलिस, नगर परिषद, ग्रामस्थ, संस्थाचालक, महिला व बालकल्याण विभागाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित केली जाणार आहे. संस्थाचालकांनीही आता विद्यार्थीसंख्येच्या प्रमाणात मूलभूत सुविधा निर्माण कराव्यात. आळंदीत १६५ संस्था आहेत. धर्मशाळांमध्ये संस्था असल्याने वसतिगृहांचा परवाना, भाडेकरार, अन्न पुरवठा विभागाचा परवाना, धर्मदाय आयुक्त परवानगी, सीसीटीव्ही यंत्रणा, लहान मुलांच्या देखभालीसाठी महिला कर्मचारी, अशा गोष्टी बंधनकारक करणे गरजेचे बनले आहे. पालकांची बैठक नियमित होणे आवश्यक आहे. आजपर्यंत संस्था मोघम चालत होत्या. मात्र, आता बंधने स्वत:हून घालून घेणे संस्थाचालकांसाठी हिताचे आहे.

आळंदीतील संस्था : १६५
मुलींच्या संस्था : १२
संस्थेची वैशिष्ट्ये : शालेय शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक शिक्षण
एका विद्यार्थ्यासाठी येणारा खर्च : निवास आणि जेवण १५ ते ३० हजार रुपये

हजारो वारकरी, कीर्तनकार घडविलेल्या संस्था
सद्‍गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीत १०० वर्षांपेक्षा अधिक काळ दिमाखात उभी आहे. शिक्षक आजन्म ब्रह्मचारी राहून निष्ठेने विनापगार ज्ञानाचे धडे देत आहेत, तर विद्यार्थ्यांना शुल्क नाही. शिवाय जेवणाची सोय मोफत आहे. तसेच सिद्धबेट येथील गुरुवर्य वै. जयराम बाबा भोसले यांनीही त्यांच्या हयातीत अनेक वर्षे राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षणाची सोय दिली. दोन्ही संस्थांनी हजारो वारकरी, कीर्तनकार घडविले, अशी आदर्श कार्य या दोन्ही संस्थांनी केले आहे, हे सर्वश्रृत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com