प्रस्थान काळात पर्यायी दर्शन बारी उभारावी
आळंदी, ता. २७ ः ‘‘आषाढी आणि कार्तिकी वारी काळात इंद्रायणीवरून संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनबारीची कायमस्वरूपी व्यवस्था म्हणून सध्याच्या भक्तीसोपान पुलाच्या जागी नव्याने बांधणे उपयुक्त ठरणार आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाची संततधार पाहता इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीत प्रस्थानपूर्वीच वाढ झाली. तर प्रस्थानवारीसाठीची दर्शनबारी भक्तीसोपान पुलावरून न आणता ती मंदिराच्या पानदरवाजा, शनिमंदिरमार्गे पर्यायी व्यवस्था म्हणून करावी,’’ असा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आळंदीत दिला.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील मंदिर, मंदिर परिसर, इंद्रायणी घाटाची स्थळ पाहणी करण्यासाठी आळंदीत आले होते. यावेळी त्यांनी इंद्रायणी नदीकाठची पूरस्थिती पाहून देवस्थानचे विश्वस्त, आळंदीकर पदाधिकारी आणि प्रशासनाशी संवाद साधत होते. या वेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पिंपरी पोलिस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त डॉ शिवाजी पवार, प्रांताधिकारी अनिल दौंडे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, आळंदी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके, डी. डी. भोसले, वैजयंता उमरगेकर, संजय घुंडरे, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांची उपस्थिती होती.
डुडी म्हणाले, ‘‘राज्य तिर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून बांधलेला स्कायवॉकचा सध्या तरी दर्शनबारीसाठी उपयोग नाही. यामुळे भविष्यात सध्याच्या भक्तीसोपान पुलाच्या जागेवरच चांगला नव्याने पूल बांधणे आवश्यक आहे. दरम्यान सध्या पावसामुळे नदीला पूर असल्याने भाविकांची सुरक्षितता जपण्यासाठी तसेच आपत्कालीन व्यवस्था म्हणून पर्यायी व्यवस्था दर्शनबारीची करणे आवश्यक आहे. ऐन प्रस्थानच्या काळात पान दरवाजा, शनी मंदिर बाजूला दर्शनबारी तात्पुरत्या स्वरूपात उभी करणे आवश्यक आहे. इंद्रायणी काठी हवेली तालुक्याच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे दर्शन मंडपसाठी जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिगृहण केली जाईल. या बाबत आदेश काढण्यात आले आहेत. तसेच नदीपात्रालगच हवेली हद्दीत अठरा मीटरचा रस्ताही सुरू केला जाईल. दरम्यान आळंदीत भेट दिल्यानंतर जिल्हाधिकारी डुडी आणि आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुणे सासवडच्या दिशेने पालखी मार्ग आणि पालखी तळाच्या पाहणीसाठी गेले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.