पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी

पोलिस बंदोबस्त वाढविण्याची मागणी
Published on

आळंदी, ता. १० ः आषाढी वारीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना वारी काळात दर्शनबारीमध्ये चहा खिचडी आणि पाणी मोफत दिले जाणार आहेत. पालखी सोहळ्यासाठीचा चांदीचा रथ आणि पालखी यांची दुरुस्तीची कामे पूर्ण झाली आहेत. मौल्यवान वस्तू दागिन्यांची चोरी होऊ नये यासाठी तसेच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मागील वर्षीपेक्षा पाच टक्के पोलिसांची संख्याबळ वाढवून देण्याची मागणी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयाकडे केली असल्याची माहिती आळंदी देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीत गुरुवारी (ता. १९) होत आहे. प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी आणि पायी वारीत सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत चार दिवस आधीच येत असतात. देऊळवाड्यात भाविकांची सुरक्षा आणि सुविधांबाबत आळंदी देवस्थानची तयारी सुरू असून, याबाबत माहिती देताना पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, ‘‘देऊळवाड्यात भाविकांच्या सुरक्षासाठी तसेच चोरीच्या घटना रोखण्यासाठी शंभर ठिकाणी कॅमेरे लावले आहेत. मंदिर व्यवस्थापनाचे स्वतःचे सुरक्षा रक्षकही आहेत. वारी काळात भाविकांच्या दर्शनाच्या व्यवस्थेसाठी तसेच पावसाची शक्यता लक्षात घेत चांगल्या स्वरूपाचा दर्शन मंडप इंद्रायणीच्या पलीकडच्या तीरावर उभारण्याचे काम सुरू आहे. साधारण पन्नास गुंठे जागेत हा मंडप उभारला जात आहे.
माउलींच्या रथाची दुरुस्तीची कामे पूर्ण झाली. दुरुस्तीनंतर रथ हाताने तसेच बैलाद्वारे ओढून चाचणी घेण्यात आली. रथ आता वारीसाठी सज्ज झाला. तर सोहळ्यासाठीची चांदीच्या पालखीला यंदाच्या वर्षी नांदेड येथील भाविकांच्या देणगीतून नव्याने सोळा किलो चांदी बसविली आहे. त्यावरचे नक्षीकामही पूर्ण झाले. वारी काळात माउलींच्या चांदीच्या पादुकांच्या पूजेची साहित्यांनाही पॉलिश करून तयार ठेवले आहेत. पालखी मार्गावर मुक्कामासाठी लागणारे तंबू तयार केले. चांदीची अब्दागिरी, चवरी, चोप यांनाही पॉलिश देण्याचे काम पूर्ण झाले आहे. तेहतीस दिवस पालखी सोहळ्याचा प्रवास असल्याने संपूर्ण प्रवासासाठी लागणारा जेवणाचा शिधा यांची व्यवस्था पूर्ण झाली आहे. राहुट्या उभारण्यासाठी लागणाऱ्या तंबूच्या साहित्यांची जुळवाजुळव पूर्ण केली आहे.
आषाढी वारीसाठी दिंड्यांना यापूर्वीच निमंत्रण देण्यात आली आहेत. यंदाच्या वर्षी पालखी सोहळा गुरुवारी असल्याने प्रस्थान काहीसे उशिराने रात्री आठच्या दरम्यान होणार आहे. मागील वर्षी ठरल्याप्रमाणे मानाच्या ४७ दिंड्या आणि नऊ पोटभाग दिंड्या अशा ५६ दिंड्यांतील प्रत्येकी नव्वद वारकरी प्रस्थानसाठी देऊळवाड्यात सोडले जातील. चेंगराचेगरीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी मागील वर्षीच दिंडीतील वारकऱ्यांचा आकडा निश्चित केला होता. त्याप्रमाणे देऊळवाड्यात प्रवेश देताना संख्येची मर्यादा निश्चित पाळली जाईल.

- पालखीला नव्याने सोळा किलो चांदी बसविली
- मंदिरात शंभर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
- दर्शनबारीसाठी भक्तीसोपान पुलाऐवजी शेजारीच इंद्रायणीवर फॅब्रिकेटेड पुलाची बांधणी
- इंद्रायणी पलिकडे पन्नास गुंठे जागेत तात्पुरता दर्शनमंडप
- प्रस्थानाच्या दिवशी मानाच्या दिंड्यांतील प्रत्येकी नव्वद वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com