वारकऱ्यांच्या मांदियाळीने अलंकापुरी फुलली
आळंदी, ता.१७ : खांद्यावरील भगव्या पताका उंचावत आणि टाळ मृदंगाच्या निनादात राज्यभरातून विविध दिंड्या आळंदीत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी दाखल होऊ लागल्या आहेत. वारकरी दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत डुबकी मारून स्नान करण्यासाठी मंगळवारी (ता.१७) पहाटेपासून दगडी घाटावर दुतर्फा गर्दी करून होते.
वारकऱ्यांच्या मांदियाळीने अवघी अलंकापुरी फुलून गेल्याचे चित्र आळंदीत आहे. मावळ भागात पाऊस सुरू असल्याने इंद्रायणीच्या पाण्याच्या पातळीत वाढ लक्षात घेता पोलिस, नगरपरिषद प्रशासन आणि देवस्थान भाविकांच्या सुरक्षेसाठी पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा गुरुवारी (ता.१९) आळंदीतून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. हा आषाढी वारीचा सोहळा अनुभवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी आळंदीत दाखल होत आहेत.
तूंब, राहुट्या उभारून मुक्कामाची सोय
अनेक ठिकाणी भाविक ट्रक टेम्पोद्वारे आळंदीत येत आहे. अनेक वारकरी परंपरेप्रमाणे दिंडीसोबत येत आहेत. आळंदी धर्मशाळांमधून वारकऱ्यांनी मागील काही दिवस मुक्काम केला आहे. तर काही वारकऱ्यांनी तूंब, राहुट्या उभारून मुक्कामाची सोय केली आहे.
महिला भाविकांसाठी चेंजिंग रूम्स
दरम्यान, महिला भाविकांचे कपडे बदलण्यासाठी नदीच्या दोन्ही बाजूने नगरपरिषदेने कपडे बदलण्यासाठी चेंजिग रूम्स तयार केल्या आहेत. याचबरोबर अल्पकालीन व्यवस्थेसाठी कर्मचारी दगडी घाटावर नेमणूक केल्याचे दिसून येते.
दिवसभरात
१. पहाटेपासून माउलींच्या संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांची देऊळवाड्यात गर्दी
२. सुरक्षेसाठी पोलिसांनी दर्शन बारी नगरपरिषद चौकातून नवीन पुलाकडे वळविली
३. भाविकांकडून देऊळवाड्यातील ओवऱ्यांत ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ वाचन
४. दर्शनमंडप, इंद्रायणी तीर आणि देऊळवाडा भाविकांच्या गर्दीने फुलला
५. तास्न तास उभे राहून भाविकांचा देऊळवाड्यात प्रवेश
पीएमपीएल प्रशासनाकडून जादा बस
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातून आळंदीत येण्यासाठी पीएमपीएल प्रशासनाने जादा बस सोडून भाविकांची सोय केली आहे. बॅटरीवरील वातानुकूलित बसमध्ये प्रवास करताना भाविक काहीसे सुखावल्याचे चित्र आहे.
प्रस्थान सोहळ्यास उद्या रात्री आठ वाजता प्रारंभ
प्रस्थानाच्या दिवशी गुरुवारी (ता.१९) नित्याची पालखी यंदाच्या वर्षी सायंकाळी साडे पाच वाजता मंदिर प्रदक्षिणेसाठी काढणार आहोत. सायंकाळी साडे सहा वाजता दिंड्यांना प्रवेश दिला जाईल. सूर्यास्तानंतर माउलींची आरती केली जाईल.त्यानंतर रात्री आठ वाजता प्रस्थान सोहळ्यास प्रारंभ केला जाईल. दुसऱ्या दिवशी पहाटेच्यावेळी दिंड्यांची वाहने पुण्याच्या दिशेने मार्गस्थ केली जाईल.
प्रस्थान दिवशी माउलींच्या पालखीचे प्रस्थान आणि नगरप्रदक्षिणासाठीचा वेळ कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. जेणेकरून दिंडीतील वारकऱ्यांना प्रस्थानाच्या दिवशी रात्री विश्रांतीसाठी उशीर होणार नाही. याची दक्षता देवस्थान कडून घेतली जाईल.
- डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.