हरिनामाच्या गजराने हरपली अलंकापुरी

हरिनामाच्या गजराने हरपली अलंकापुरी

Published on

आळंदी, ता. १९ :
हेची व्हावी माझी आस।
जन्मोजन्मी तुझा दास।।
पंढरीचा वारकरी
वारी चुको नेदी हरी।।
असे मनोमन पांडुरंग चरणी प्रार्थना करत संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी इंद्रायणी तीरी लाखो वैष्णवांचा मेळा जमला आहे. राज्यभरातून आलेल्या छोट्या मोठ्या साडेचारशेहून अधिक दिंड्या येथील विविध धर्मशाळा, राहूट्यात पाच दिवसांपासून विसावलेल्या होत्या. दिंडीतील वारकऱ्यांची इंद्रायणी घाटावरील रंगणारी भजने आणि टाळ मृदंगाच्या निनादात सारा परिसर भक्तिरसात आकंठ न्हाऊन निघाला. फुलांची आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईने देऊळवाडा उजळून निघाला. तर मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेतही भल्या पहाटेपासून भाविकांनी तीर्थस्नानासाठी गर्दी केली होती. हवेतील गारठ्याने आणि पावसाने चिंब भिजलेल्या भाविक वारकऱ्यांची भक्ती तसूभरही न ढळता ज्ञानोबा तुकारामांचा अखंड गजर करत भक्तिरसात तल्लीन असल्याचे चित्र आज अलंकापुरीत पाहायला मिळाले.
कपाळी गंध, बुक्का, हाती वीणा घेउन वारकरी येत होते. घाटावर विविध दिंड्यांचे भजन, भारूड व माउलींचा जयघोष घुमत होता. भक्तिरसात तल्लीन झालेल्या महिला, पुरुष वारकरी हरिनामाची फुगडी अत्यानंदाने खेळत होते. बहुतांश दिंड्या नगर प्रदक्षिणा करत होत्या. वारकऱ्यांच्या खांद्यावरील पताकांनी इंद्रायणी काठ, गोपाळपुरा, प्रदक्षिणा रस्ता भगवेमय झाले होते. तसेच ज्ञानोबा माउली तुकारामांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमला होता. आळंदीत सुमारे साडे चारशेहून अधिक छोट्यामोठ्या दिंड्या दाखल झाल्या. दिवसभरात ठिकठिकाणच्या राहुट्या, धर्मशाळांमधून माउलीनामाचा गजर होत होता. पहाटे मंदिरात घंटानाद झाल्यानंतर माउलींना पवमान अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा आणि दर्शनासाठी भाविक वारकऱ्यांची गर्दी होती. दर्शनासाठीची रांग भक्तिसोपान पुलावरून नदीपलीकडे गेली होती.
आळंदीत आठवडाभर पावसाचे वातावरण आहे. रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू होती. आज पहाटेपासूनच पाऊस पुन्हा सुरू झाला. इंद्रायणीही दुथडी भरून वाहत होती. दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्रायणीत तीर्थस्नान करण्यासाठी भाविकांची दाटी नदीच्या दुतर्फा पहाटेपासूनच होती. कुडकुडणारे शरीर घेऊन भाविक मंदिराच्या दिशेने सरकत होता. माउलींच्या दर्शनासाठी दिवसभर मोठी गर्दी होती. पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. ठिकठिकाणी देऊळवाड्याकडे येणारे रस्ते बंद केले. प्रत्यक्ष प्रस्थान सोहळा सुरू होणार असल्याने खबरदारी घेतली जात होती. आज गुरूवारमुळे पालखी प्रस्थान नेहमीपेक्षा उशिराने सायंकाळनंतर सुरू होणार असल्याने भाविक काहीसे दुपारपर्यंत निवांत होते. सायंकाळी पाचनंतर भाविक प्रस्थान सोहळा अनुभवण्यासाठी देऊळवाड्याच्या दिशेने सरकत होते. दिंड्यांची लगबग मंदिरप्रवेशासाठी दिसून येत होती. भराव रस्ता, गणेश दरवाजासमोर दिंड्या रांगा करून होत्या.

विद्युत रोषणाईने उजळले मंदिर
बुधवारी (ता. १८) दुपारपासून देऊळवाड्यात फुलांची आरास करण्यात येत होती. देऊळवाड्यात विविध ठिकाणी विविध रंगीत फुलांचा वापर करून आरास केली. महाद्वारात विठ्ठल रुक्मिणीची फुलांनी सजावट केली होती. तर मंदिराच्या अवतीभवती आणि कळसावर विद्युत रोषणाई केल्याने देऊळवाडा रात्रीतून उजळून निघाला होता. अनेक भाविक छायाचित्र आणि रिल्स बनविण्यासाठी उत्साह दाखवत असल्याचे चित्र होते. दरम्यान गुरुवारी (ता. १९) रात्री उशिराने प्रस्थान होणार असल्याने प्रखर प्रकाशाच्या दिव्यांची व्यवस्था देवस्थानकडून केली होती.

नाही आनंदाला पारावार...
शुक्रवारी (ता. २०) सकाळी सहाच्या दरम्यान सोहळा पुण्याच्या दिशेने पंढरीसाठी मार्गस्थ होणार असल्याने दोन दिवसांपासून वारकरी तयारीला लागले होते. दिंडीकरी आपले तंबू राहुट्या सामानाची जुळवाजुळव करून आपापले ट्रक तयार ठेवत होते. उद्या पंढरीच्या दिशेने सुरू होणाऱ्या पायीवारीची आस लागलेली दिसून येत होती. त्यामुळे प्रत्येक वारकरी भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून
वाहत होता.

पुण्याहून आळंदीकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद
पुणे-आळंदी रस्त्याने पालखी जाणार असल्याने चारचाकी तसेच अवजड वाहनांना संपूर्ण पालखी मार्गावर बंदी असणार आहे. दिंडीकऱ्यांची वाहने मरकळ लोणीकंद मार्गे पुण्याच्या दिशेन वळविण्यात येणार आहेत. लोहगावमार्गे पुन्हा कळस येथे दिंडीकऱ्यांची काही जेवणाची वाहने पास पाहून सोडली जातील. पुण्याहून आळंदीकडे येणारा मार्ग पूर्णपणे वाहतुकीस बंद असणार आहे असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com