वाहनतळावर पावती न देताच वसुली
आळंदी, ता. १० ः आळंदी नगरपरिषदेचे चाकण चौकातील वाहनतळ हे मागील २० वर्षांपासून भ्रष्टाचाऱ्यांसाठी पैसे खाण्याचे कुरण ठरले आहे. वाहनतळावर नगरपरिषदेने गेली काही वर्षे कर्मचारी लावून वसुली करण्यास सुरुवात केली. मात्र, कर्मचारीही वाहनचालकाला पावती न देताच वाहनतळात वाहन लावण्यासाठी शुल्क आकारत असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे ठेक्यातील, तसेच रोजंदारीवरील कर्मचारी वसूलीसाठी नेमल्याने विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आळंदी नगरपरिषदेचे स्वतःचे इंद्रायणीकाठी वाहनतळ आहे. सर्वांना सोयिस्कर आणि जवळचे असल्याने अनेकजण याच ठिकाणी वाहने लावण्यास प्राधान्य देतात. दरम्यान, नगरपरिषदेने स्वतःचे कर्मचारी लावून वाहनतळाचे शुल्क भाविकांकडून आकारत आहेत. मात्र, तळे राखी तो पाणी चाखणारच या उक्तीप्रमाणे भाविकांनी गाडी वाहनतळात आणली की, त्याला मनमानीप्रमाणे शुल्क सांगितले जाते. भाविकही गाडी लावण्याची सोय झाली म्हणून शुल्क देऊन टाकतात. एखाद दुसरा पावती मागतो, पण पावती दिली जात नाही. हे वास्तव असूनही प्रशासनाकडून यावर कारवाई केली जात नाही.
वाहनतळात दिवसाकाठी २०० ते ४०० गाड्याहून अधिक गाड्या येतात. मात्र, पालिकेचे उत्पन्न दिवसाकाठी अत्यल्पच ठरले आहे. वाहनतळातून येणाऱ्या रकमेपैकी काही रक्कम गावगुंडांनाही दिली जाते. नाही दिली तर संध्याकाळी हिशोबाच्या वेळी येऊन जबरदस्तीने गुंड येऊन घेऊन जातात. मात्र, यावर कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. याचबरोबर वाहनतळावर सीसीटीव्हीही आहे. मात्र, सध्या तो बंद अवस्थेत आहे. लाखोंची कमाई पालिकेला असलेल्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी नगरपरिषद प्रशासन उदासीन असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
खरे तर तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांची गर्दी असल्याने नगरपरिषदेला उत्पन्नाचा भाग म्हणून वाहनतळावर शुल्क वसुली आकारली जाते. मात्र, पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ठेकेदार आणि कर्मचारीच गब्बर झाल्याचे चित्र आहे. यामुळे भाविकांची लूटमार करण्यापेक्षा वाहनतळ मोफत ठेवण्याची मागणी होत आहे.
याबाबत बुलडाणा येथील भाविक जगदीश आमले यांनी सांगितले की, ‘‘देवदर्शनासाठी आळंदीत आलो. वाहनतळावर लावलेल्या फलकापेक्षा जास्त रक्कम मला सुरुवातीला सांगितली. मात्र, १०० रुपये दिले. पावतीची मागणी करूनही दिली नाही. पैसे देऊन विना पावती गाडी वाहनतळात लावली.’’
सोशल मीडियातील व्हीडिओद्वारे वाहनतळावर कर्मचाऱ्यामार्फत विना पावती शुल्क आकारल्याचे लक्षात आले. त्याची शहानिशा करण्यासाठी तीन सदस्य समिती गठित केली आहे. या समितीने दोन दिवसांत अहवाल द्यावयाचा आहे. प्राप्त अहवालानंतर संबंधित कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद
वाहनतळावर अवैध दारू विक्री
वडगाव घेनंदकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोशाळेलगत एक वाहनतळ राज्यतिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकसित केले. मात्र, त्याठिकाणी अवैध दारू विक्री केली जाते. रात्रीच्यावेळी गुन्हेगारांचा वावर असतो. तसेच, इथल्या पदपथावर अवैधपणे पथारीवाले व्यवसायासाठी बसलेले असतात. राज्य सरकारने करोडो रुपये गुंतवून जागेचे भूसंपादन केले. शौचालय बांधले, डांबरीकरण केले. मात्र, शहराच्या मुख्य वर्दळीच्या भागात वाहनतळ असूनही नागरिकांना याचा वापर करता येत नसल्याचे चित्र आहे.