तुकोबांच्या पालखीला आळंदीचे निमंत्रण

तुकोबांच्या पालखीला आळंदीचे निमंत्रण

Published on

आळंदी, ता. १२ : संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव आणि संत तुकाराम महाराजांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळ्याचे औचित्य साधून तुकाराम महाराजांची पालखी परतीच्या प्रवासात आळंदीत आणावी यासाठी आळंदी देवस्थानाकडून देहू देवस्थानला पत्राद्वारे निमंत्रण देण्यात आले आहे. आळंदी देवस्थान आणि ग्रामस्थांकडून जोरदार स्वागत केले जाणार असल्याचा पत्रात उल्लेख आहे. दरम्यान २८ जुलै २००८ मध्ये तुकाराम महाराजांच्या ४०० व्या जन्मोत्सवावेळी तुकोबांचा पालखी सोहळा आळंदीमध्ये आला होता.
माउलींचा पालखी सोहळा आळंदीत रविवारी (ता. २०) येणार आहे. त्याच दिवशी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीत यावा असे निमंत्रण देवस्थानाकडून दिले आहे.
याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानचे सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे आणि विश्‍वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी आळंदी देवस्थानच्यावतीने देहू देवस्थानचे अध्यक्ष जालिंधर महाराज मोरे यांना दिले आहे. परंपरेप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आळंदीतील संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या भेटीस जाणे महत्त्वाचे मानले जाईल. संत तुकाराम महाराज आळंदीत माउलींचे दर्शन घेतल्यानंतर पंढरपूरला मार्गस्थ होत. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र तोपनिधी नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरू केला. १६८५ पासून देहूमधून संत तुकारामांच्या पादुका पालखीत ठेवून ते आळंदीत येत. नंतर संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पादुका पालखीत घेत पुढे पंढरपुरला प्रस्थान करत. त्यानंतर ही परंपरा खंडित झाल्यावर गुरू हैबतबाबा आरफळकर यांनी १८३२ मध्ये स्वतंत्रपणे संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा सुरू केला. आणि दोन्ही संतांच्या पालखीचे मार्ग बदलले. दोन्ही पालखी सोहळ्यात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी होत आहेत. या दोन संतांची भेट होण्यासाठी या वर्षी सोहळा आळंदीला नेण्याची मागणी वारकऱ्यांच्यावतीने आळंदी देवस्थानने देहू देवस्थानला केली आहे. दोन्ही देवस्थानच्या विश्‍वस्तांमध्ये सखोल चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार असून आळंदीमध्ये स्वागतासाठी तयारीबाबत देवस्थान तयारी करत आहेत.

पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा
यापूर्वी संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन पालख्यांच्या भेटीचा अनुपम सोहळा २८ जुलै २००८ रोजी झाला होती. दोन्ही देवस्थानांच्या एकविचाराने संत तुकाराम महाराजांचा सोहळा आळंदीमध्ये आला होता. यावेळी आळंदीकर ग्रामस्थ आणि देवस्थानाकडून जोरदार स्वागत झाले होते. त्यावेळी जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्म चतुःशताब्दी वर्षाचे औचित्य होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com