आळंदी वनविभागाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आळंदी, ता. ९ : धानोरे (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना सोमवारी (ता. ६) वनविभागाकडून मार्गदर्शन करण्यात आले. तालुक्यात बिबट्यांची झालेली वाढ पाहता तसेच विषारी सापांपासून सतर्कता बाळगण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक रितेश साठी यांनी मार्गदर्शन केले. याबाबत माहिती देताना मुख्याध्यापक सत्यवान लोखंडे यांनी सांगितले, शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या वन्यजीव सप्ताह निमित्त सामाजिक वनीकरण वनविभाग जुन्नर व परिक्षेत्र चाकण यांच्या संयुक्तपणे येथील शाळेमध्ये हा कार्यक्रम घेतला. कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी बिबट आपले मित्र तसेच विषारी व बिनविषारी साप या विषयावर आधारित सखोल माहिती दिली.’’ याप्रसंगी जुन्नरचे सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे, चाकण वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, वनपाल आनंदकुमार इंदलकर, पवन आहेर, सुवर्णा जगताप, संतोष गावडे, सुनीता गावडे, ज्योती गावडे आदी उपस्थित होते. पांडुरंग आव्हाड यांनी सूत्रसंचालन तर मुकुंद गावडे यांनी आभार मानले.