गावकी- भावकी पहिली, मग पक्षनिष्ठा
गावकी- भावकी पहिली, मग पक्षनिष्ठा
आळंदी शहरामध्ये मागील पाच वर्षांमध्ये भाजपने पक्षीय बांधणी चांगली केली. मात्र, निष्ठावान आणि पक्षांतर केलेले राजकीय सभासद यामुळे भाजपमध्ये निवडणुकीसाठी दोन गट तयार झाल्याचे प्राथमिक चित्र आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, अशा चौरंगी लढाईबरोबरच स्थानिक विकास आघाडीचे राजकारण पुन्हा सुरू होण्याची चिन्ह आहेत. मात्र, एवढे सगळे होत असताना पक्षीय राजकारण केवळ तिकिटापुरते नगरपालिकेत मात्र गावकी भावकीचेच वर्चस्व असले पाहिजे, ही भूमिका सध्या आळंदीमध्ये दिसून येत आहे.
- विलास काटे, आळंदी
आळंदी नगर परिषदेच्या निवडणुका मागील अनेक वर्षे स्थानिक विकास आघाड्यांच्या प्रभावाखाली लढल्या गेल्या. यामध्ये शिवसेना एकमेव पक्षाने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. मागील पंचवार्षिकमध्ये भाजपने पूर्ण ताकद लावत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आणि नगरपरिषदेवर वर्चस्व गाजवले. मागील निवडणुकीत नगराध्यक्षपदासह अकरा नगरसेवकाचे संख्या बळ भाजपकडे, शिवसेनेकडे सहा आणि दोन पुरस्कृत, असे आठ नगरसेवक होते. अनेक विकासाची कामे भाजपच्या काळात झाली. केंद्रात राज्यात आणि स्थानिक पातळीवरती सत्ता आल्यामुळे भाजपला काम करणे सोपे गेले. त्यातच कार्यकर्त्यांची संघटना प्रबळ झाली. मात्र नगरसेवक आणि पक्षीय संघटना यामधले अंतर वाढत गेले. परिणामी भाजपकडे सत्तेमुळे इच्छुकांची गर्दी वाढली असताना दुफळी असल्याचे पूर्ण चित्र आहे. एका गटाला भाजपने जवळ केले, तर दुसरा गट अन्य पक्षातर्फे किंवा स्थानिक विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढण्याचे चिन्ह आहेत.
नगराध्यक्षपद खुले असल्याने एकनाथ शिंदे यांच्याकडेही अन्य पक्षांतील लोक आकृष्ट होत आहेत. त्यातच शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील उदय सामंत व अन्य काही लोकांनी आळंदीसाठी मागील वर्षभरात अनेकदा निधी दिला. याचाही प्रभाव आगामी निवडणुकीत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असल्याने आणि माजी आमदार दिलीप मोहिते यांचे आळंदीकर यांचे असलेले नातेसंबंध पाहता राष्ट्रवादी पक्ष ही यंदाच्या निवडणुकीत आपली मोर्चेबांधणी करू पाहत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक ‘मशाली’ चिन्हावर निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. पूर्ण २१ जागांवर उमेदवार मिळतील की नाही, याची जवळपास सर्वच पक्ष चाचणी करत आहे. एकंदर आळंदी नगर परिषदेच्या निवडणूक या चौरंगी होण्याची दाट शक्यता आहे.
आळंदी नगरपरिषद मागील पंचवार्षिकमध्ये लोकमतातून अनुसूचित जातीच्या आरक्षित नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या वैजयंता कांबळे उमरगेकर या अवघ्या ३७ मतांनी निवडून आल्या. त्यांनी शिवसेनेच्या (एकत्रित) भाग्यश्री रंधवे या उमेदवाराचा पराभव केला. यंदा नगराध्यक्षपद खुल्या गटासाठी असल्याने नगराध्यक्षपदासाठी अनेकांची इच्छा उत्पन्न झाली आहे. २५ वर्षांपूर्वी बबनराव कुऱ्हाडे हे खुल्या गटातून नगराध्यक्ष लोकमातातून झाले. त्यानंतर प्रथमच लोकमतातून पुन्हा एकदा खुल्या प्रवर्गातील नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. खुल्या प्रवर्गात परिणामी चुरस निर्माण झाले असून, घुंडरे, कुऱ्हाडे, तापकीर याचबरोबर व्यापारी वर्गातून काही मंडळी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत.
आळंदीतील स्थानिक समस्या
- पिण्याचा पाण्याचा प्रश्न
- वाहतूक कोंडी व अतिक्रमण
- वाढलेली घरपट्टी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

