इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी

इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी

Published on

आळंदी, ता. १४ : कपाळी बुक्का... केसरी गंध... गळ्यात तुळशीच्या माळा... मुखातून ज्ञानोबा तुकारामांचा अखंड जयघोष करत खांद्यावरील भगवा पताका उंचावत राज्यभरातून वैष्णवांची मांदियाळी अलंकापुरीत दाखल झाली आहे. इंद्रायणी काठ आणि मंदिरावर विद्युत रोषणाई केल्याने परिसर उजळून गेला आहे.
चला आळंदीला जाऊ। ज्ञानदेवा डोळा पाहू।
होतील संतांचिया भेटी। सांगो सुखाचिया गोष्टी॥
ही भावना उरी ठेवून आळंदीत वैष्णव दाखल झाले आहेत. शनिवारी (ता. १५) कार्तिक एकादशीचा मुख्य कार्यक्रम आहे. मध्यरात्रीपासूनच पूजा, अभिषेक असे सुरू झालेले धार्मिक कार्यक्रम दिवसभरही होणार आहेत. दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी देऊळवाड्याबाहेर निघणार आहे.
कार्तिक वारीतील मुख्य एकादशी सोहळा आणि माउलींचा समाधी सोहळा अनुभवण्यासाठी आणि घराण्याची परंपरेने चालत आलेली वारी माउलींचरणी समर्पित करण्यासाठी वारकऱ्यांची पावले आळंदीत येऊ लागली आहेत. पंढरपुरातून विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या पांडुरंगांचा पादुका पालखी सोहळा आळंदीत आल्या आहेत. आळेफाटा येथून रेड्याची पालखी दाखल झाली असून वासकर, शिरवळकर, टेंभुळकर, उखळीकर, शिवनेकर, गुरुजी बुवा राशीनकर या मोठ्या फडकरी दिंड्यांचे आगमन आळंदीत उत्साहात झाले आहे. पंढरपुरातील छोट्या-मोठ्या दिंड्या तर पुणे जिल्ह्यातून मुळशी, मावळ, आंबेगाव पठार येथून अनेक दिंड्या आळंदीत दाखल झाल्या आहेत. कोकण भागातून दिंड्यांचे प्रमाण मोठे आहेत. आळंदीत आज दिवसभर हरिनामाचा जागर, भजन, कीर्तन, प्रवचन, ज्ञानेश्‍वरी पारायण सुरू आहेत.
पहाटेपासून वारकऱ्यांची गर्दी समाधी मंदिर परिसर आणि इंद्रायणी काठी होती. साधारण दोन ते अडीच तास समाधी दर्शनासाठी लागत होता. दर्शनाची रांग भक्ती सोपानपुल, इंद्रायणी काठावरून स्काय वॉक मार्गे वळवण्यात आली होती. दर्शनाच्या रांगेत चहा पाणी मोफत देण्यात येत होते. आळंदी देवस्थानच्या वतीने खिचडी प्रसादही दर्शन बारीत देण्यात येत होता.

पोलिसांकडून चोख बंदोबस्त..
आळंदी, पिंपरी चिंचवड शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन उत्तम करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी भाविकांना खास करून वृद्ध भाविकांना महाद्वारातून सोडण्यात येत होते. मंदिर प्रदक्षिणा केल्यावर भाविकांच्या चेहऱ्यावर दर्शनाचा आनंद दिसून येत होता. नगरपालिका चौक, आजोळघर भराव रस्ता या भागात पोलिसांनी बॅरिकेडिंग केले होते. तर चौकांमध्ये वॉच टॉवर मधून पोलिस संशयित हालचाली टिपण्यासाठी उभे होते. भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे प्रदक्षिणा रस्ता, चावडी चौक, नगरपरिषद चौक महाद्वार चौक या भागांमध्ये पब्लिक ऍड्रेस सिस्टीम माध्यमातून सतर्कतेच्या सूचना दिल्या जात होत्या.

धरणातून पाणी सोडले तरी दुर्गंधी जाईना
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषित पाण्यामुळे इंद्रायणी काळवंडली होती. मात्र मावळ भागातील धरणातून पाणी सोडल्याने इंद्रायणीच्या पाण्याचा रंग काहीसा निवळला आहे. मात्र दुर्गंधी कमी झाली नाही. तरीही भावनाप्रधान वारकऱ्यांनी तीर्थस्थान करण्याचा आनंद घेतला.

देऊळवाड्यात मुख्य एकादशीचा कार्यक्रम
- दुपारी बारा ते साडेबारा महानैवेद्य
- दुपारी एक वाजता माउलींची पालखी नगर प्रदक्षिणेसाठी महाद्वारातून बाहेर पडेल
- रात्री साडेआठ वाजता पालखीचे मंदिरात आगमन आणि धुपारती
- रात्री बारा ते पहाटे चार मोजे यांच्या वतीने जागर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com