आळंदीत ‘जागते रहो’चा नारा
आळंदी, ता. २८ : येथील नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांना पैसा रुपी प्रलोभन दाखविणाऱ्या विरोधी प्रचारकाला खिंडीत पकडण्यासाठी अनेकजण गल्लीबोळातून नजर ठेवून आहेत. थंडीमुळे काही ठिकाणी शेकोट्या पेटवून रात्रीचा जागता पहारा केला जात आहे.
प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने घोंगडी बैठकांनाही जोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि दोन्ही शिवसेना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनेक ठिकाणी मतदार याद्यांच्या घोळामुळे मतदारांची नावे प्रभाग बदलून आली आहेत. मयत मतदारांची नावे अद्याप हटविली नसल्याने अनेकांचा घोळ होत आहे. बाहेरील जिल्ह्यातून विस्थापित होऊन आळंदीत आलेले अनेक मतदारांनी भाड्याच्या खोल्या बदलल्याने, तसेच ते लगतच्या गावांमध्ये राहायला गेल्याने उमेदवारांना त्यांना शोधण्यासाठी दमछाक होत आहे. अनेक ठिकाणी मतदार दहा- पंधरा वर्षांपासून राहत नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी मतदारांच्या नावाखाली एजंट्स उमेदवाराकडून पैसे उकळत असल्याचे चित्र आहे. दहा हजार रुपयांपासून एका मताला भाव असल्याचे बोलले जाते.
काही प्रभागांमध्ये नगराध्यक्षासह दोन उमेदवारांना मत मागितले जात आहे, तर काही ठिकाणी उमेदवार स्वतःसाठीच मत मागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मतदानावेळी क्रॉस वोटिंगचा फटका बऱ्याच प्रभागांमध्ये दिसून येणार आहे. वारकरी संप्रदाय, तसेच रोजंदारीवरील लोकांचे मतदान आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांनी रिक्षाद्वारे प्रचार सुरू केला आहे. त्याचबरोबर महिला, तरुण कार्यकर्त्यांच्या पदयात्रांनाही जोर आला आहे.
विरोधी उमेदवारांवर पाळत
विरोधी उमेदवाराचे प्रचाराचे गणित काय हे करण्यासाठी काही उमेदवारांनी आपापले गुप्तहेर कामाला लावले आहेत. उमेदवाराचे घर, त्यांच्याबरोबर निघणाऱ्या कार्यकर्त्यांवर पाळत ठेवून, तसेच काही प्रसंगी सोबत राहूनच माहिती पुरवण्याचे काम हे हेर करीत असल्याचे चित्र आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

