माउलींच्या मंदिराला शालेय सहलींची भेट

माउलींच्या मंदिराला शालेय सहलींची भेट

Published on

आळंदी, ता. २३ : संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिर दर्शनासाठी सध्या राज्यभरातून सहली येत आहेत. शालेय विद्यार्थी माउलींच्या मंदिरास भेट देऊन दर्शनाबरोबरच त्यांच्या जीवन कार्याबाबत माहिती घेत आहेत. आळंदीत आल्यावर विद्यार्थ्यांना समाधीबाबत कुतूहल असल्याचे पाहायला मिळत आहे.
थंडीचा हंगाम असल्याने आणि मुख्य सहामाही परीक्षा झाल्यानंतर साधारण नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये राज्यभरातून शालेय विद्यार्थ्यांच्या सहली माउलींच्या दर्शनासाठी आळंदीत येतात. ठीक ठिकाणाहून खासगी बस तसेच एसटी महामंडळाच्या गाड्या करून विद्यार्थी आळंदीमध्ये येतात. अष्टविनायक तसेच आळंदी देहू दर्शनासाठी विद्यार्थ्यांच्या सहली आग्रही असतात. आळंदी हे मध्यवर्ती आणि मुक्कामासाठी चांगली सोय असल्याने बहुतांश शालेय सहलींचा मुक्काम आळंदीतील विविध धर्मशाळांमध्ये सध्या पाहायला मिळतो. किफायतशीर आणि मध्यवर्ती ठिकाणी मुक्कामाची सोय असल्याने शालेय विद्यार्थ्यांना आळंदीतील धर्मशाळांमध्ये सुरक्षित वातावरण आहे. विशेष करून प्रदक्षिणा रस्ता देहू फाटा इंद्रायणी नगर चाकण रस्ता या भागामध्ये अनेक एसटी रात्रीच्या वेळी उभे असलेल्या पाहायला मिळत आहेत. विद्यार्थ्यांना आळंदीत आल्यानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे समाधी दर्शन आणि त्यानंतर अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना माउलींच्या जीवन कार्याबद्दल आणि समाधी बाबतची माहिती सांगताना देऊळवाड्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतर माउलींनी चालवलेली भिंत, सिद्धबेट परिसर पाहण्यासाठी विद्यार्थी उत्सुक असल्याचे चित्र आहे. आळंदीत आल्यानंतर मंदिर परिसरातील दुकानांमध्ये विद्यार्थ्यांचे खरेदीसाठी झुंबड उडाली असल्याचे चित्र सकाळच्या प्रहरी साडेपाच ते साडेआठ आणि रात्रीच्या मुक्कामाच्या वेळी पाहायला मिळते आहे. विद्यार्थ्यांच्या सहलीमुळे प्रसाद विक्रेते तसेच खेळणी विक्रेत्यांना आर्थिक हातभार मिळत असल्याचे चित्र आहे. मंदिर परिसरातील महाद्वाराबरोबर रस्ता शनी मंदिर भागामध्ये विशेष करून खेळण्यांच्या दुकानदारांची सध्या चलती आहे.
आळंदी दर्शनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना हरिपाठ ज्ञानेश्‍वरीबाबतही माहिती काही वारकरी विद्यार्थी सांगत आहेत. यामुळे थंडीच्या हंगामातील विद्यार्थ्यांचे सहल आळंदीत आल्यावर विद्यार्थ्यांना काही सुखावल्यासारखे वाटते. स्थानिक विक्रेत्यांना रोजगार आहे मिळत असल्याचे चित्र आहे. या तीन-चार महिन्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या सहलींची गर्दी माउलींच्या मंदिरामध्ये सकाळच्या टप्प्यामध्ये तसेच रात्रीच्या वेळेत हमखास पाहायला मिळते. विद्यार्थी एका रांगेमध्ये शिस्तीने माऊलींच्या समाधी दर्शनासाठी जात असतात. विद्यार्थ्यांची सहलीमध्ये विद्यार्थी चुकू नये अशी जबाबदारी सहलीबरोबर येणाऱ्या शिक्षक खबरदारी घेत असल्याचे चित्र आवर्जून पाहायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com