आळंदी वाहनतळाच्या जागेत भाजीपाला विक्री

आळंदी वाहनतळाच्या जागेत भाजीपाला विक्री

Published on

आळंदी, ता. २४: आळंदी नगरपरिषदेने तरकारी व भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांसाठी वडगाव रोड येथील गोशाळा लगतच्या नगरपरिषद मालकीच्या वाहनतळाच्या जागेत भाजीपाला विक्रीस परवानगी देण्याचा ठराव मंजूर केला आहे.
भाजीपाला बाजाराच्या निर्णयामुळे स्थानिक शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले आहे. दररोज दुपारी १२ ते ३ या वेळेत भाजीपाला विक्रीस परवानगी दिली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली. राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखडामधून विकसित केलेल्या वाहनतळाच्या जागेत भाजी मंडई वसविली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, वाहनतळ्याच्या जागेत भाजी मंडई बसविण्याबाबतचा ठराव नगर परिषदेच्या विशेष बैठकीमध्ये शुक्रवारी (ता. २३) एकमताने मंजूर झाला. या निर्णयामागचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाला विक्रीची संधी निर्माण होईल. त्यांचा अडथळा धूर होऊन नागरिकांना ताज्या भाजीपाल्याची नेहमीच उपलब्धता होणार आहे. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी व नियोजनही केले जाणार आहे. रस्त्यावर विक्रेते बसत असल्याने वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाचा प्रश्न होता. यामुळे वडगाव रस्त्यावरील गोशाळा लगतची वाहनतळाची जागा निश्चित करण्यात आली. या ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने विक्री होणार आहे. सार्वजनिक वाहतूक अडथळा होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. नेमून दिलेल्या ठिकाणाव्यतिरिक्त कुणालाही विक्री करता येणार नाही. पदपथावर अतिक्रमण केल्यास मालाची जप्ती केली जाणार आहे.
नगरपरिषदेच्या विशेष सभेमध्ये वाहन तळ्याच्या जागेमध्ये वाहनांना पार्किंग उपलब्ध करून देण्याऐवजी भाजी मंडई बसविल्याने आता पार्किंग करायची कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्यावर वाहने उभे केले तर वाहतूक पोलिस उचलून नेतात आणि दंडात्मक पावत्या आकारतात. दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेने भूसंपादन करून या जागेमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून लाखो रुपये खर्चून वाहनतळ विकसित केले. मात्र, या ठिकाणी नगरपालिकेकडून कधीच वाहनतळ वसविले गेले नाही. यामुळे वडगाव रस्ता परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी झाली. आता शेतकऱ्यांच्या नावाखाली बाहेरून आलेले विस्थापित अतिक्रमण करणार नाही ना अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

07065

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com