आळंदीचा सर्वसमावेशक विकास आराखडा
आळंदी, ता. १२ : सामाजिक कल्याण आणि समावेशक योजना अंतर्गत नगर परिषदेच्या वतीने तृतीयपंथी व्यक्तींसाठी ३ टक्के आणि दिव्यांग कल्याणासाठी ५ टक्के निधीचे वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर थकीत मालमत्ता कराबाबत अभय योजनेस मुदतवाढ दिली असून ज्या नागरिकांची थकबाकी आहे त्यांना प्रति महिना दोन टक्के याप्रमाणे व्याज भरावे लागते; परंतु अभय योजनेच्या अंतर्गत व्याजावर ५० टक्के सवलत देण्याचा ठराव गुरुवारी (ता. १२) सर्वसाधारण सभेमध्ये एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
आळंदी नगर परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी उपनगराध्यक्ष सुजाता तापकीर आणि नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी तब्बल १११ विषयांवर चर्चा करण्यात आली. मुख्याधिकारी खांडेकर म्हणाले की, ‘‘ आळंदी शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, नागरिक सुविधा सुधारणा व धार्मिक-पर्यटन क्षेत्र बळकट करण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण होती. शहरात राहणाऱ्या तृतीयपंथी आणि दिव्यांग बांधवांच्या उत्थानासाठी तसेच त्यांना व्यवसाय कामासाठी उद्युक्त करण्यासाठी हा निधी राखीव ठेवला असून तो पुढील काळात वितरित केला जाणार आहे. मागील काही वर्षापासून मिळकत कर थकबाकी वाढली असल्यामुळे नागरिकांना मिळकतकर भरण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी नगर परिषदेकडून अभय योजनेस मुदतवाढ देण्यात आली. ज्या नागरिकांची थकबाकी आहे सवलत मिळवण्यासाठी नागरिकांनी मागणी अर्ज नगर परिषदेच्या कर विभागात सादर करणे आवश्यक आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर नगराध्यक्ष यांना पदसिद्ध सदस्य म्हणून घेण्याबाबतचा ठरावही एकमताने पारित करण्यात आला. याचबरोबर ऑनलाइन कर प्रणाली, नवीन प्रशासकीय इमारत प्रस्ताव, विविध यंत्रसामग्री खरेदी, अधिकारी प्रशिक्षणाबाबतच्या विषयांना मंजुरी देण्यात आली.’’
स्वच्छता व पर्यावरण व्यवस्थापन
शहर स्वच्छतेच्या दृष्टीने घनकचरा व्यवस्थापन, डेपो सुधारणा, मशिनरी दुरुस्ती, स्वच्छ सर्वेक्षण तयारी, नदी व नाला गाळ काढणे, स्वच्छता नियोजन, रोड स्वीपर मशीन, अनधिकृत नळ जोड सर्व्हे, सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणी व दुरुस्ती याबाबतच्या विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.
नदी, तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास
आळंदी शहरामध्ये पर्यटन वाढावे तसेच आळंदी शहराचे सार्वजनिक स्थळांची पर्यटकांना माहिती व्हावी यासाठी आज नगर परिषद सर्वसाधारण सभेत चर्चा करण्यात आली. यामध्ये खास करून इंद्रायणी नदी घाट व्यवस्थापन, दगडी घाटावरील अंत्यविधी बंदी प्रस्ताव, इंद्रायणी नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा विकास, पुरातन कुंडांचे पुनरुज्जीवन, तीर्थक्षेत्र विकास आराखडा, बोटिंग सुविधा, धार्मिक परिसर विकास, दर्शनासाठी ई-वाहन व्यवस्था आदी विषय सभेत एक मताने मंजूर झाले.
पायाभूत सुविधा व नागरी विकास
शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण, ड्रेनेज लाइन, पदपथ, भूमिगत केबल, पथदिवे, गतिरोधक, पार्किंग नियोजन, उद्यान विकास, सीसीटीव्ही बसविणे, पाणीपुरवठा नियोजन, टाक्या दुरुस्ती, प्रवेश कमान, जोडरस्ते विकास इत्यादी मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधा बाबतच्या कामांना सभेमध्ये मंजुरी देण्यात आली.
सार्वजनिक सुविधा व सुरक्षा
बसस्थानक नियोजन, पार्किंग व्यवस्था, घाट सुरक्षा, धोकादायक वीजवाहिन्यांची दुरुस्ती, सार्वजनिक जागांचे सुशोभीकरण ठराव सभेमध्ये मंजूर करण्यात आला.
इंद्रायणी नदी घाट ताब्यात घेण्याबाबत...
इंद्रायणी नदी घाट पूर्णपणे नगर परिषदेच्या ताब्यात घेणे. हा विषय एकमताने मंजूर करण्यात आला. इंद्रायणी नदी काठावरील दोन्ही बाजूचा घाट नगरपरिषदे मार्फत देखभाल दुरुस्ती करण्याचा ठराव करण्यात आला. यामध्ये आळंदी देहू विकास परिसर समिती यांनी घाटावर यापुढे नगरपालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही कार्य करू नये असा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आज झालेल्या सर्वसाधारण
सभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

