आळंदीतील मजूर अड्डा बनतोय अडथळा
आळंदी, ता. १५ : आळंदी नगरपरिषद हद्दीतील पुणे- आळंदी रस्त्यावरील एसटी महामंडळाच्या जागेपुढील मजूर अड्डा रस्त्यावर मधोमध उभा राहत असल्याने वाहतुकीस अडथळा होत आहे. तसेच, पीएमपीएल आणि एसटी प्रवाशांनाही या मजूर अड्ड्यामुळे उपद्रव होत असल्याचे चित्र आहे. यामुळे देहू फाटा येथील एसटी महामंडळाच्या जागेपुढील मजूर अड्डा हलवून तो चाकण रस्त्याकडे न्यावा, अशी मागणी नागरिक, प्रवासी करीत आहेत.
आळंदी- देहू फाटा येथील एसटी महामंडळाची सात एकरहून अधिक जागा मध्यवर्ती ठिकाणी पुणे- आळंदी रस्त्यावर आहे. सध्या या ठिकाणी एसटी आणि पीएमपीएल एकाच ठिकाणाहून थांबतात. तसेच, पुढे मार्गस्थ होतात. आळंदी गावठाणातील देहू फाटा परिसरातील अनेक प्रवासी, विद्यार्थी, यात्रेकरू या ठिकाणी बस पकडण्यासाठी येतात. मात्र, स्थानकातील प्रवेशद्वारातच रस्त्याच्या मधोमध ४०० ते ५०० मजूर उभे असतात. यापैकी अनेकजण हे मद्य पिलेले असतात. त्यामुळे महिला, भाविक, विद्यार्थिनी, महिला कामगार यांना अडथळा होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत या ठिकाणी मजूर कामाच्या शोधात उभे असतात.
दिघी पोलिस ठाणे आणि पीएमपीएल प्रशासन, तसेच एसटी महामंडळाला याबाबत पत्रव्यवहार नागरिकांच्या सह्या देऊन केला जाणार आहे. मजूर अड्ड्यावर अनेक मद्यपी असल्यामुळे महिला प्रवाशांची छेडछाड होण्याची शक्यता आहे. तसेच, अनेकदा वाहतुकीवरून वाद होतात. पोलिस प्रशासनाने वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- सचिन गिलबिले, नगरसेवक
दिघी पोलिस ठाणे, तसेच आळंदी पोलिस ठाणे यांना याबाबत नगरपरिषद शासनाकडून पत्रव्यवहार केला जाईल, जेणेकरून येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. देहू फाटा एसटी स्थानकाच्या जागेतील रस्त्यावर उभा राहणारा मजूर अड्डा हा चाकण चौकापुढे बाह्यवळण रस्त्याला उभा केला जाईल, जेणेकरून कुणाचीच गैरसोय होणार नाही.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष
आम्ही दररोज महाविद्यालयात जाण्यासाठी बस स्थानकात येतो. मात्र, प्रवेशद्वारातच मजुरांची अतोनात गर्दी असते. अनेकजण यामध्ये मद्य पिलेले असतात. तसेच, बस स्थानकामधून बस बाहेर काढतानाही या मजुरांचा अडथळा होतो. त्यामुळे प्रवास करण्यास उशीर होतो.
-सायली पाटील, प्रवासी विद्यार्थिनी
07192
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

