आळंदी पोलिस ठाण्याच्या नव्या इमारतीचे काम सुरू
आळंदी, ता. १६ : आळंदी शहर पोलिस ठाण्याची सध्याची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी आता नवीन इमारतीचे काम सुरू करण्यात आले आहे. जवळपास आठ कोटी ९० लाख रुपये खर्चून ही इमारत महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांच्या वतीने बांधण्यात येत आहे. नागरिकांच्या सोईकरिता तात्पुरत्या स्वरूपात आळंदी शहर पोलिस ठाणे आळंदी नगरपरिषद शॉपिंग सेंटर दोनमध्ये पहिल्या मजल्यावर सध्या कार्यरत आहे.
राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने आणि आषाढी कार्तिकी अशा दोन प्रमुख वाऱ्या आळंदीमध्ये पार पडत असतात. त्याचबरोबर महिन्याची एकादशी गुरुवार, रविवार आणि लग्नाच्या तिथीवेळी आळंदीत गर्दी असते. आळंदी शहरामध्ये वाहतुकीची समस्या किंवा राज्य मंत्रिमंडळातील राजकीय नेते, मंत्री यांचे सदस्य दौरे दर्शनाच्या निमित्ताने किंवा विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आळंदीत येतात. यामुळे आळंदी पोलिस ठाण्याच्या अंकित पोलिसांची संख्या वाढली आहे. सध्या आळंदी पोलिस ठाण्यामध्ये एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि दहा पोलीस अधिकारी, ५१ पुरुष पोलिस अंमलदार, ४० महिला पोलिस अंमलदार असे कर्मचारी नियुक्त आहेत. त्याचबरोबर वाहतूक विभाग कर्मचारी संख्या ही तेवढीच आहे. आषाढी कार्तिकी वारीत दोन अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असतो. परिणामी सध्याची इमारत प्रशासकीय कामासाठी अपुरी आणि गैरसोयीची होती.
सध्याची इमारत १८ गुंठे जागेत होती. मात्र त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची पायाभूत सुविधा नव्हती तसेच इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालया अंतर्गत नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादित यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता. त्या अनुषंगाने महामंडळाकडून आठ कोटी ९० लाख १७ हजार रुपयांची मंजुरी देण्यात आली. नव्या इमारतीचे काम संगमनेर येथील के. के. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले. १८ महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट संबंधित बांधकाम करणाऱ्या कन्स्ट्रक्शन कंपनीस देण्यात आली आहे. यामुळे लवकरच आळंदी शहराच्या मध्यवर्ती आळंदी शहर पोलिसांची नवीन इमारत दिमाखात उभी राहणार आहे.
अशी आहे इमारत
-तळमजला आणि वर चार मजले अशी इमारत असणार
-प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र व्यवस्था
-स्वतंत्र फर्निचर आणि शौचालय, बाथरूमसह पायाभूत सुविधा
-स्वतंत्र लॉक अप व्यवस्था
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

