

आळंदी, ता. १२ : राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकाराने आणि आळंदी नगरपरिषदेच्या समन्वयातून येथे बालहक्क संवेदनशीलता कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. आळंदी तीर्थक्षेत्र परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बालकांचे संरक्षण, बाल हक्कांविषयी जनजागृती, बाल भिक्षेकरी निर्मूलन आणि सुरक्षित बालस्नेही वातावरण निर्माण करणे हा या कार्यशाळेचा उद्देश आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून आळंदी शहरात बालकांच्या हक्कांविषयी जनजागृती होऊन आळंदी हे राज्यातील ‘बालस्नेही तीर्थक्षेत्र’ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाचे नियोजन आणि कृती आराखडा दहा दिवसात राज्य बाल हक्क संरक्षण आयोगास नगर परिषदेने सादर करावयाचा आहे. ही कार्यशाळा मंगळवारी (ता. २४ मार्च) सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत आळंदीतील फ्रुटवाले धर्मशाळा येथे होणार आहे. याबाबत माहिती देताना मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, आळंदी हे वारकरी संप्रदायाचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असल्यामुळे येथे अनेक निवासी शाळा, वेदपाठशाळा व शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बालकांचे संरक्षण, त्यांचे कायदेशीर हक्क आणि बाल शोषण रोखण्यासाठी या कार्यशाळेचे विशेष महत्त्व आहे.
या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे प्रतिनिधी, गट शिक्षणाधिकारी व शिक्षण विभागाचे अधिकारी, बाल मानसशास्त्रज्ञ, कायदेविषयक तज्ज्ञ, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे पथक, विशेष बाल पोलिस पथकाचे प्रतिनिधी, तसेच बाल हक्क क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे ७० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, आळंदी शहरातील विविध शाळांचे संस्था चालक, मुख्याध्यापक व शिक्षक सहभागी होणार आहेत. कार्यशाळेमध्ये पॉक्सो कायदा, बाल हक्क संरक्षण कायदे, बालकांवरील अत्याचार प्रतिबंध कायदा, सुरक्षित व असुरक्षित स्पर्श याबाबत मार्गदर्शन, तसेच शाळांमध्ये बालस्नेही वातावरण निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांवर चर्चा होणार आहे.
बालहक्क संवेदनशीलता कार्यशाळेचे उद्देश
१) नगर परिषदेचे कर्मचारी, स्थानिक पोलिस, मंदिराचे विश्वस्त आणि सुरक्षारक्षक यांच्यासाठी पॉक्सो कायद्यांतर्गत प्रशिक्षण.
२) मंदिर परिसर, बसस्थानक, बाजारपेठ अशा ठिकाणी बाल मजुरी प्रतिबंधात्मक संदेशांच्या फलकांद्वारे जनजागृती.
३) बाल भिक्षेकरी आढळल्यास त्याचे पुनर्वसन करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या समन्वयाने विशेष मोहीम.
४) शालेय स्तरावर गुड टच-बॅड टच प्रबोधन कार्यक्रम.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.