इंद्रायणीकाठी बालमजुरी, मद्यपींचा सुळसुळाट
आळंदी, ता. १७ तीर्थक्षेत्र आळंदीत अल्पवयीन मुलांकडून सक्तीने गंध लावून घेऊन, त्यातून मिळणाऱ्या पैशातून पालकांनी मद्यपान करण्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. इंद्रायणी काठी आणि मंदिर परिसरात वाढलेला हा बालमजुरीचा प्रकार, मद्यपी ज्येष्ठ नागरिक आणि तृतीयपंथीयांचा उपद्रव यामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण असून प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी होत आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गंध लावण्याच्या बहाण्याने ६ ते १० वर्षे वयोगटातील मुले गराडा घालतात. धक्कादायक बाब म्हणजे, या मुलांचे पालक त्यांना शाळेत पाठवण्याऐवजी दिवसभर नदीकाठी गंध लावण्यासाठी सोडतात. मुलांनी दिवसभरात कमावलेले २०० ते ५०० रुपये पालक दर काही तासांनी गोळा करतात आणि त्यातून स्वतःची मद्यपानाची हौस भागवतात. यामुळे ही मुले शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहत आहेत.
दुसरीकडे, वारकऱ्यांचा वेश परिधान करून काही ज्येष्ठ नागरिकही मद्यधुंद अवस्थेत भाविकांना गंध लावण्याचे काम करत आहेत, ज्यामुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलीन होत असल्याची भावना सामाजिक कार्यकर्ते शशी राजे जाधव यांनी व्यक्त केली. तसेच, मंदिर परिसरात तृतीयपंथीयांकडून बळजबरीने पैसे मागणे आणि पैसे न दिल्यास शिवीगाळ करण्याचे प्रकारही वाढले आहेत.
नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी या टोळ्यांचा बंदोबस्त करावा, मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल करावे आणि व्यसनी पालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक मल्हार काळे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
मंदिर परिसर आणि इंद्रायणी काठी तृतीयपंथीयांचा उपद्रव वाढला आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच हे तृतीयपंथी भीक मागण्यासाठी मंदिरापुढे येतात. अनेकदा बळजबरीने भाविकांच्या पुण्यात उभे राहून १०, २० रुपये गोळा करतात. पैसे दिले नाही तर शिवीगाळ करायला कमी करत नाहीत. काही तृतीयपंथी तर मद्यप्राशन केलेले असतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

