आळे येथे पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून दुरुस्ती

आळे येथे पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून दुरुस्ती

आळेफाटा, ता. ११ : पावसाळा जवळ आल्याने आळे येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाकडून पावसाळ्यात सार्वजनिक वीज वितरण व्यवस्था कोलमडून जिवीत, वित्तहानी होऊ नये यासाठी खबरदारी घेतलेली आहे. दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडून तसेच तार तुटून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. यावेळी पावसात अशा घटना किंवा अपघात होऊ नये, म्हणून महावितरणने आत्तापासून प्रयत्न केले आहेत.
‘‘पावसाळ्यात वादळी वारे आणि पाऊस पडत असताना विद्युत पुरवठा चालू असल्यास दुर्घटना होण्याच्या शक्यतेमुळे विद्युत पुरवठा बंद करावा लागतो. ज्या ठिकाणी विद्युत तार तुटली असेल, झाडे पडली असतील किंवा डीपी वर काही तांत्रिक बिघाड झाल्यास स्थानिकांनी ताबडतोब वीज कर्मचाऱ्यांना संपर्क साधावा, तसेच कुणीही विद्युत तारेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये. वादळात, पावसात कर्मचाऱ्यांना काम करणे जिकिरीचे असते. निसर्गापुढे आमचा नाइलाज असतो त्यामुळे पाऊस थांबेपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावे,’’ असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

दरम्यान आळेफाटा परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असून अनेक शेतांमधून गेलेल्या विजेच्या तारा लोंबकळत असल्याने वाऱ्यामुळे त्यांचे घर्षण होते व यामुळे शॉर्टसर्किट होऊन मोठा ऊस जळाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून ज्या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे त्यांना महावितरणकडून कोणत्याही प्रकारची भरपाई मिळत नसल्याने ती देण्यात यावी अशी मागणी होत आहे.
यावर उपाय म्हणून महावितरणने विजेच्या लोंबकळणाऱ्या तारा, ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल, फ्यूज चेक करून घेणे विजेचे वाकलेले खांब आदींची त्या त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती करून घ्यावी.

उसाला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान

‘‘१९७२ ते २००२ या तीन दशकांमध्ये ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये कृषी पंपासाठी रोहित्र व वीज जाळे उभे केले आहे. जुन्या झालेल्या तारा वितळून शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. उसाला आग लागल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. म्हणून महावितरणने वीस वर्षांच्या मागील सर्व टाकलेल्या वीज वाहिन्या बदलण्याची विशेष मोहीम राबवावी. कृषी पंप वीज ग्राहकांचे होणारे नुकसान टाळावे.’’ अशी प्रतिक्रिया दैनिक सकाळची बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मध्य महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com