

आळेफाटा, ता. १८ : बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथील प्रगतशील शेतकरी सारिका संपत चिंचवडे यांनी लखपती बनविणाऱ्या सागवानच्या टिश्यू कल्चर ब्रम्हा वाणाची लागवड केली आहे.
जिल्ह्यात प्रथम त्यांनी दीड एकरमध्ये चारशे रोपांच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. लाकडांचा राजाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने शाश्वत उत्पन्न मिळणार आहे.
ब्रम्हा सागवानाची लागवड हैदराबादमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतली जाते. हा वाण आठ ते दहा वर्षांतच काढायला येतो. त्यामुळे सारिका चिंचवडे यांनी दोन वर्षांपूर्वी कृषी विभागाने आयोजित केलेल्या जळगाव येथील अभ्यास दौऱ्यात सहभाग घेतला व साळवाडी (ता.जुन्नर) येथे लागवड करण्याचा निर्णय घेतला. नियोजनबद्ध लागवड केली. सध्या सागवानाला सुमारे प्रतिघनफूट ४६०० रुपये घनफूट बाजारभाव मिळतो. एका झाडापासून २० ते २५ हजार रुपये आठ ते दहा वर्षाला उत्पन्न मिळते, असे चिंचवडे यांनी सांगितले. दरम्यान, लागवडीसाठी कृषी अधिकारी राजश्री नरवडे, सुजाता खेडकर आदींनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याचे त्यांनी नमूद केले.
सागाची अशी केली लागवड
१. दीड एकर क्षेत्रात सुमारे पाच ट्रॉली शेण खत पांगवले
२. आठ बाय आठचे अंतर ठेवून ट्रॅक्टरच्या मदतीने बेड पाडले
३. जबलपूरहून ४५ हजार रुपयांची चारशे टिश्यू कल्चर ब्रम्हा वाणाची रोपे आणली
४. रोपांमध्ये चार ते पाच फुटांचे अंतर ठेवले. यामुळे औषधे फवारणी करावी लागली नाही
लाकडाचा उपयोग
१. दहा वर्षांत चाळीस ते पन्नास फुटांपर्यंत वाढ
२. एका झाडापासून दहा ते बारा घनफूट लाकूड मिळते
३. जहाज बांधणी, रेल्वे विभागात, खेळण्यांसाठी उपयोग
४. टिकाऊ फर्निचरसाठी ग्रामीण, शहरी भागातून मोठी मागणी
अधिक मागणी असणाऱ्या ब्रम्हा वाणाची लागवड सन २०२३ मधील एप्रिल महिन्यात लागवड केली. सध्या चौदा ते पंधरा फुटांपर्यंत रोपांची उंची वाढली आहे. अधिक मागणी असल्यामुळे यातून निश्चित शाश्वत उत्पन्न मिळेल. जंगली वनस्पती असल्याने ही रोपे कुठल्याच रोगास बळी पडत नाहीत.
- सारिका चिंचवडे, शेतकरी
जुन्नरमधील शेतकरी सध्या वागाच्या लागवडीकडे वळला आहे. भविष्यातील बाजारपेठ ओळखून मागील पाच वर्षांत तालुक्यात १५० एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर सागाची सलग आणि बांधावर लागवड झाली आहे. भविष्यात जास्त फायदा करून देणाऱ्या टिश्यू कल्चरच्या रोपांमुळे एकसारखी आणि जातिवंत रोपे उपलब्ध आहेत.
- राजश्री नरवडे, जुन्नर तालुका कृषी अधिकारी
बाजारभाव प्रतिघनफूट
२०२२............ ३२००
२०२३ ............ ३६००
२०२४ ............ ३७००
२०२५ ............ ४५००
सागाच्या वाणांचे प्रकार
१. देशी
२. मलेशियन
३. मलबारी
४. टिशू कल्चर ब्रम्हा
06001
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.