पाणी प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करा
आळेफाटा, ता. १४ : ‘‘अहिल्यानगर जिल्ह्यातील निळवंडे धरण १८ कोटी रुपयांत होणार होते, परंतु वेळेत पूर्ण न झाल्याने ६ हजार कोटी अंतिम कामाला लागले. तीन पिढ्या खपल्या, तेव्हा हे काम पूर्ण झाले. राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की, ते वेळेत पूर्ण झाले नाही. यापुढे हे टाळायला हवं. त्यामुळे पुढील काळात सर्व कामे वेळेत पूर्ण करा,’’ अशी सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांनी दिली.
जुन्नर तालुक्यातील चिल्हेवाडी या मध्यम प्रकल्पाच्या धरणातून तालुक्याच्या पूर्व भागातील १९ गावांसाठी बंदिस्त नलिकेद्वारे ३९ किलोमीटर लांबीची पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेपैकी २८ किलोमीटर लांबीच्या योजनेच्या कामाचे पाणीपूजन सोमवारी (ता. १२) मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते कोळवाडी येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, भाजपच्या नेत्या आशा बुचके, अनंतराव चौगुले, प्रसन्न डोके, अमोल शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गणेश कवडे, उद्योजक सचिन वाळुंज, माजी सरपंच प्रदिप देवकर, अशोक घोडके, संतोष सांगळे, नवनाथ निमसे आतिषा कुऱ्हाडे, विशाल कुऱ्हाडे, दिनेश सहाणे, संजय गाढवे, उल्हास सहाणे, अजित सहाणे, म्हतू सहाणे, शिवाजी गाढवे, अर्चना सहाणे, शैला गाढवे, ललिता पारवे, संतोष पाडेकर, पंकज कणसे, संजय गुंजाळ, नीलेश भुजबळ आदी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले, ‘‘जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांसाठी वरदान ठरलेले चिल्हेवाडी बंदीस्त पाइपलाइन काम अंतिम टप्प्यात असून, या कामासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. २८ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ११ किलोमीटर लांबीचे काम लवकर पूर्ण होणार आहे. अष्टविनायकांपैकी ओझर येथे नौका नयन प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची लवकरच बैठक घेऊ.’’
आमदार सोनवणे म्हणाले, ‘‘चिल्हेवाडी हे मध्यम प्रकल्पाचे धरण आहे. या धरणाची साठवण क्षमता एक अब्ज घनफूट (एक टीएमसी) एवढी आहे. या धरणाचे काम सन २००० मध्ये पूर्ण झाले असून, बंद पाइप लाईन कामासाठी पहिल्यांदा सन २०१०मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर हे काम अंतिम टप्प्यात आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील चिल्हेवाडी, पाचघरवाडी, आंबेगव्हाण, रोहकडी, ओतूर, डुंबरवाडी, खामुंडी, गायमुखवाडी, पिंपरी पेंढार, वडगाव आनंद, जांभूळपट, नवलेवाडी, आळेफाटा, आळे, कोळवाडी, लवणवाडी, राजुरी, गुंजाळवाडी, बेल्हे, बांगरवाडी या २१ गावांना बंदिस्त नलिकेच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात येणार आहे. पूर्व भागातील ७ हजार ६९७ हेक्टरमधील जमिनी सिंचनाखाली येणार आहेत. जुन्नर पूर्व भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे. तसेच आणे पठार भागाचा ज्वलंत असलेला पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’
आशा बुचके म्हणाल्या, ‘‘पिंपळगाव जोगे कालव्याच्या पोटचाऱ्यांमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या आहेत, त्यांना अद्यापपर्यंत मोबदला मिळाला नव्हता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर हा विषय अंतिम टप्प्यात आहे. संबंधित शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत.’’
गणेश गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच संजय गाढवे यांनी आभार मानले.
चाऱ्यामधून पाणी देऊ लागलो तर पाणी कोणालाच मिळणार नाही. भविष्य काळामध्ये बंद नलिकेतून पाणी देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यामुळे तीस ते पस्तीस टक्के पाण्याची बचत होत आहे. त्यामुळे अधिक क्षेत्र पाण्याखाली येईल. जुन्नर तालुक्यात बंद पाइपमधून पाणी नेण्याचा प्रयोग अजून दोन-तीन ठिकाणी करा.
- राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.