राजुरीतील पर्यावरण जनसुनावणी रद्द

राजुरीतील पर्यावरण जनसुनावणी रद्द

Published on

आळेफाटा, ता. ४ : राजुरी (ता. जुन्नर) येथे होत असलेल्या जुन्नर शुगर लिमिटेड या डिस्टिलरी प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्यामुळे शुक्रवारी (ता. ४) याबाबतची पर्यावरण जनसुनावणी रद्द करण्यात आली.
राजुरी येथे प्रस्तावित ३०० केएलपीडी केन सिरप/मोलॅसिस/धान्यावर आधारित जुन्नर शुगर लिमिटेड डिस्टिलरी प्रकल्पासाठी शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने आयोजित सुनावणीस अप्पर जिल्हाधिकारी ज्योती कदम, उपप्रादेशिक अधिकारी नवनाथ अवतडे, तहसीलदार डॉ. सुनील शेळके आदी अधिकारी उपस्थित होते. मात्र, सुनावणीपूर्वी स्थानिक ग्रामपंचायतींना वेळेवर लेखी सूचना न देण्यात आल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी तीव्र आक्षेप नोंदवला. तत्पूर्वी, परिसरातील शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी केली. ‘प्रकल्प हटाव, पर्यावरण वाचवा’, ‘शेतकऱ्यांना संपवणारा कारखाना नकोच’ अशा घोषणा देत ग्रामस्थांनी निषेध व्यक्त केला.पर्यावरणीय जनसुनावणीत स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला.
या कारखान्यामुळे परिसरातील निसर्गसंपदा, कृषी अर्थव्यवस्था आणि स्थानिक ग्रामस्थांच्या जीवनशैलीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून, या प्रकल्पास तत्काळ पर्यावरणीय मंजुरी नाकारावी, या सुनावणीची माहिती योग्य पद्धतीने ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचली नाही. ग्रामपंचायतीला लेखी नोटीस द्यावी व गावात दवंडीच्या माध्यमातून जागृती झाली नाही, अशी भावना व्यक्त करत बाळासाहेब औटी यांनी सुनावणी रद्द करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून आयोजित केलेल्या आजच्या जन सुनावणीसाठी उपस्थित ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन पारदर्शक पद्धतीने जीवन सुनावणी घेतली जाईल. संबंधित ग्रामपंचायत लेखी नोटीस बजावण्यात येईल.
सदर जनसुनावणी रद्द करण्यात आल्याचे जाहीर करत असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम सांगितले.
या प्रसंगी माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माऊली शेळके, वल्लभ शेळके, एम. डी. घंगाळे, चंद्रकांत जाधव, सुरेश पाटील औटी, सुभाष औटी, प्रमोद औटी, भरत घंगाळे, लहू गुंजाळ, सुरेश बोरचटे, मुरलीधर औटी, रमेश औटी, रामदास औटी, संजय पिंगळे, सुरेश औटी आदी उपस्थित होते.
या वेळी औटी म्हणाले, ‘‘या प्रकल्पासाठी लागणाऱ्या पाण्यामुळे शेतीसाठी असलेला जलस्रोत प्रभावित होण्याची शक्यता असून, वाढती ऊस लागवड व त्याचा अन्नधान्य पिकांवरील परिणाम होणार आहे. तसेच, सांडपाण्यामुळे भूजल व नद्यांचे प्रदूषण जैवविविधतेवर, विशेषतः पक्षी व वनस्पती प्रजातींवर प्रतिकूल परिणाम होणार आहे. स्फोटक व ज्वलनशील पदार्थांमुळे संभाव्य अपघाताचा धोका आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com