आळे येथील जाधव महाविद्यालयाची इंडेक्स हर्बेरियममध्ये अधिकृत नोंद
आळेफाटा, ता. ८ : आळे (ता. जुन्नर) येथील बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील हर्बेरियमला न्यूयॉर्क बोटॅनिकल गार्डनमार्फत इंडेक्स हर्बेरियम मध्ये अधिकृत नोंद मिळाली असून, त्यासाठी बीजेबी हा अॅक्रोनेम प्राप्त झाला आहे.
या हर्बेरियममध्ये १५ हजार हून अधिक वनस्पतींचे नमुने (स्पेसिमेन्स) साठवून ठेवले आहेत, ज्यात दुर्मीळ व नामशेष प्रजातींचा समावेश आहे. या संस्थेचे विशेष कौतुक करण्यासारखे कारण म्हणजे, पदवी स्तरावर वनस्पतिशास्त्राचा विशेष अभ्यासक्रम नसतानाही राज्यातील पहिलेच महाविद्यालयीन संस्था आहे. जिच्या हर्बेरियमची नोंद जागतिक यादीत झाली आहे. या यशामुळे आता हे हर्बेरियम देश-विदेशातील अभ्यासक व संशोधकांसाठी खुले झाले आहे. हे हर्बेरियम सन २००९ मध्ये स्थापन झाले असून यामध्ये डॉ. सविता रहांगडाले यांचे मोठे योगदान आहे. त्या गेली १० वर्षे या हर्बेरियमची क्युरेटर म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.
प्राचार्य डॉ. प्रवीण जाधव यांनी सांगितले की, युनिव्हर्सिटी किंवा संशोधन संस्था यांना अशा यादीत स्थान मिळवणे तुलनेने सोपे असते, मात्र पदवी स्तरावर वनस्पतिशास्त्राचा विशेष अभ्यासक्रम नसतानाही संस्थेने हर्बेरियमच्या क्षेत्रात मिळवलेले हे यश खूपच महत्त्वाचे असून हे हर्बेरियम नैसर्गिक विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, औषधी वनस्पतिशास्त्र आणि फार्मसी यांसारख्या क्षेत्रात अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. डॉ. सविता रहांगडाले यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
या संस्थेचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे यांनी सांगितले की, जुन्नर तालुका वेगाने विकसित होत असून शेतीच्या पद्धतीत झपाट्याने बदल होत आहेत. त्यामुळे अनेक परदेशी (एक्झॉटिक) गवत व तण प्रजाती येथे आढळू लागल्या आहेत. या वनस्पतींची ओळख पटवून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे हे या हर्बेरियमचे एक महत्त्वाचे कार्य ठरत आहे. याबद्दल वनस्पतिशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.