बोरी बुद्रूक येथील पुलाची दुरवस्था
आळेफाटा, ता. ८ ः बोरी बुद्रूक व आळेगाव (ता. जुन्नर) या दोन गावांना जोडणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यावर असलेल्या पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बोरी बुद्रुक व आळेगाव या दोन गावांना जोडणारा कुकडी डाव्या कालव्यावर असलेल्या पुलाची अतिशय दुरवस्था झाली असून, या पुलावरून वाहतूक करणे धोक्याचे आहे. या पुलाच्या खालच्या बाजूने स्लॅब निघायला सुरुवात झाली असून, आतील स्टील बाहेर दिसू लागले आहे. या पुलावरून नेहमीच जड वाहने ये- जा करत असतात. भविष्यात या पुलाची दुरुस्ती न झाल्यास या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन काम करून घेणे गरजेचे आहे.
दरम्यान, या पुलावरून नेहमीच वर्दळ असते. या पुलाच्या कामाला जवळपास ३० वर्षे झालेले असून, त्यातच या कालव्याला मोठ्या दाबाने पाणी सोडलेले असते. याबाबात येथील ग्रामस्थांनी वांरवार सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली आहे. तरी संबंधित खात्याने या भिंतीची त्वरित दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
07154