राजुरीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
आळेफाटा, ता. ८ ः राजुरी (ता. जुन्नर) येथे बुधवारी (ता. ८) पहाटेच्या सुमारास वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.
येथील गोविंद शंकर हाडवळे यांच्या शेतावर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी स्थानिक ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार वन विभागाने बाजूला असलेल्या शेतात पिंजरा लावला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या पिंजऱ्यात अडकला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वन अधिकारी ए. जी. सोनवणे, विष्णू उचाळे व रेस्क्यू पथकाने पकडलेल्या बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात सोडले आहे. तसेच, बिबट्या हा नर जातीचा असून, चार ते पाच वर्षे असल्याचे सांगितले. दरम्यान, १५ दिवसांपूर्वी याच शेतकऱ्याच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात मादी जेरबंद झाली होती. त्यांच्या पिलांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गावातील आडेवहाळ मळ्यातील प्रकाश जाधव यांच्या अंगणात मंगळवारी (ता. ७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला होता. या गावातील नागरिकांना दररोज कुठेना कुठे बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाने पिंजऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक वल्लभ शेळके यांनी केली आहे.
07156