आळेफाटा पोलिसांचा एकाच खोलीत कारभार
आळेफाटा, ता. २७ ः आळेफाटा (ता. जुन्नर) येथील पोलिस ठाण्याची जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील महत्त्वाचे पोलिस ठाणे म्हणून ओळख असून, हे अहिल्यानगर- कल्याण व पुणे- नाशिक या राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती ठिकाणी आहे. मात्र, या पोलिस ठाण्याचा कारभार फक्त एका छोट्याशा खोलीतून चालत आहे.
या पोलिस ठाण्याअंतर्गत पिंपळवंडी ते आळेखिंड, वडगाव आनंद ते व्हरुडी, मंगरूळ ते नळावणे दरम्यानची तब्बल ४२ किलोमीटरची विस्तीर्ण हद्द येते. मात्र, येथे महिला कोठडी नाही. गुन्ह्यात हस्तगत केलेला माल ठेवण्यासाठी नसलेली स्वतंत्र खोली आणि हा सारा कारभार हाकण्यासाठी मिळालेली एक छोटीशी खोली अशी, जर्जर अवस्था सध्या आळेफाटा पोलिस ठाण्याची झाली आहे.
आळेफाटा परिसरात गुन्हेगारीत अलीकडे मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असली, तरी या ठिकाणी कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी आपल्या जिवाची बाजी लावत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास लावत आहे. परंतु, या ठिकाणी राहत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना राहण्याची देखील सोय उपलब्ध नसल्याने बाजूच्या गावांमध्ये जाऊन राहावे लागत आहे.
राज्याच्या गृह खात्याला या पोलिस ठाण्याच्या सक्षमीकरणाचा जणूकाही विसरच पडला असल्याचे चित्र सध्या दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला या पोलिस ठाण्याचा कारभार अनेक पटींनी वाढूनही आजही त्याच छोट्याशा खोलीतूनच सुरू आहे. या पोलिस ठाण्यात वर्ष २०१६पासून पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या वाढत गेली असली तरी जागेच्या कमतरतेमुळे या पोलिस ठाण्याच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. येथे पोलिस निरीक्षक एक, सहाय्यक पोलिस निरीक्षक एक, पोलिस उपनिरीक्षक चार व ५० कर्मचारी काम करतात. आळेफाटा पोलिस ठाण्यात महिलांसाठी ड्रेसिंग रूमची सुविधाही उपलब्ध नाही. जागेची अडचण सोडविण्यात यावी, यासाठी स्थानिक अधिकारी वरिष्ठ कार्यालयांकडे लेखी विनंती दरवर्षी करीत आलेले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्षच करण्यात येत असल्याची स्थिती आहे.
07379
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

