आळेफाटा गावाची शहारच्या दिशेने वाटचाल
आळेफाटा गावाची शहारच्या दिशेने वाटचाल
राजेश कणसे
संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यांच्या सरहद्दीवर असलेले जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या
शहराची व्यापारी पेठ म्हणून ओळख आहे. हे शहर जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचे ठिकाण आहे. अहिल्यानगर-कल्याण व पुणे-नाशिक या राष्ट्रीय महामार्गाला जोडलेले हे मध्यवर्ती ठिकाण आहे. आळेफाटा या गावचा बसस्थानकाच्या पूर्वेकडील काही भाग हा आळे ग्रामपंचायतीच्या तर पश्चिमेकडील काही भाग वडगाव आनंद ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येत आहे. साधारणपणे १९८० च्या दशकापूर्वी आळेफाटा हे अगदी छोटेसे गाव होते. त्यावेळी दिवसा या ठिकाणी यायला नागरिक घाबरत होते. वातावरण बदलत गेले आणि आज छोट्या गावाचे मोठ्या शहरात रूपांतर झाले आहे.
आळेफाटा येथील चौकात पूर्वी फक्त चहाची टपरी होती. काळानुसार येथील वातावरण बदलत गेले आणि छोट्या गावाचे शहरात रूपांतर झाले. मध्यवर्ती ठिकाण असल्याने आणि दोन महामार्ग जोडले गेल्यामुळे या शहरामध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाला आहे. येथील बसस्थानकात चारही बाजूंनी येणारी वाहने थांबू लागल्याने व्यवसायीकरण वाढले. सुरवातीच्या काळात तुरळक प्रमाणात गॅरेज लाइनला सुरू झाली. हळूहळू हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढून शहरात वाहनांची खरेदी विक्री वाढल्याने या ठिकाणी वाहन खरेदीसाठी अनेक बाहेर गावाहून ये-जा करू लागले. हे करताना सुरुवातीला वाहन रिपेअरींग करण्यासाठी पुणे किंवा बेळगाव या ठिकाणी जावे लागायचे. त्यामुळे येथील काहीजण वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होते त्यांनी याच ठिकाणी नवीन वाहन रिपेअरींगचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये प्रगती होत गेली आणि आज या ठिकाणी नवीन वाहन आणल्यानंतर त्यांचे संपूर्ण बॉडी केबीन येथे केले जात आहे. येथे संर्पुण वाहनाचे काम होत आहे. आज आळेफाटा शहरात सुमारे तीस ते चाळीस बॉडी केबिनचे काम करणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे सुमारे तीनशे ते साडे तीनशे कामगार आहेत.
तसेच वाहन उद्योगाबरोबर हॉटेल, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू आणि इतर व्यवसाय देखील वाढले आहेत. विशेष म्हणजे पुर्वी लोकांना कुठला आजार झाला किंवा मोठा अपघात झाला तर त्या रुग्णाला पुणे किंवा मुंबई या ठिकाणी न्यावे लागायचे. परंतु आज आळेफाटा या ठिकाणी पुणे, मुंबई या ठिकाणी ज्या प्रमाणे उपचार करतात तसेच उपचार आळेफाटा येथे होत आहेत. मोठमोठी रुग्णालये असून रुग्णांवर उपचार करण्यासाठी अद्ययावत मशिनरी या दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत. आज हे शहर कृषी उत्पन्न जुन्नर बाजार समितीची उपबाजारपेठ आहे. या ठिकाणी कांदा लसूण तसेच डाळिंबांची मोठी बाजारपेठ आहे. दर आठवड्याला लाखो रुपयांची उलाढाल येथे होत आहे. तसेच या ठिकाणी दर गुरुवारी गायींचा बाजार भरत असून या बाजारात विविध भागातून अनेक शेतकरी गाई खरेदी-विक्रीसाठी घेऊन येतात.
आज आळेफाटा शहरात बिल्डींग मटेरीअलचा व्यवसाय सुरू असून घरांसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी मिळत असल्याने ग्राहकांना अहिल्यानगर-पुणे या ठिकाणी जायची गरज लागत नाही. विशेष म्हणजे आज घरासाठी लागणारा पत्रा बनविण्याचा कारखाना देखील या ठिकाणी सुरू आहे. आज आळेफाटा येथील बसस्थानकावर दररोजच्या सुमारे तीनशे ते साडे तीनशे बस दररोज ये-जा करतात त्यामुळे येणाऱ्या प्रवाशांमुळे व्यवसायांना चालना मिळत आहे. भविष्यात या ठिकाणाहून पुणे-नाशिक रेल्वे महामार्ग जात असून आळेफाटा हे मोठे रेल्वे स्थानक राहणार आहे.
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्यामुळे व्यवसायांचे स्त्रोत्र वाढले आहेत. नोकरी आणि व्यवसायानिमित्त अनेक लोक या ठिकाणी रहात असल्यामुळे दिवसेंदिवस आळेफाटा शहराची लोकसंख्या वाढत आहे. भविष्यात हे शहर नगरपरिषद म्हणून नाव लौकिकाला येईल.

