ज्येष्ठ महिलेची फसवणूक करणाऱ्यास बेड्या
आळेफाटा, ता.१९ : बेल्हे (ता. जुन्नर) येथे एका भामट्याने तलाठी असल्याची बतावणी करून उल्हासाबाई संतू डोंगरे (वय ६८, रा. डोंगरवाडी, काताळवेढे, ता. पारनेर जि. अहिल्यानगर) यांची फसवणूक केली होती. याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार आळेफाटा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ज्ञानदेव हरिभाऊ चेडे याला सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक लाख ८१ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आळेफाटा पोलिस ठाण्याच्या पोलिस अधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या घटनेची दखल घेतली. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तपासून गुप्तहेरांचीही माहिती घेतली. दरम्यान, संशयित आरोपी चेडे (वय ४५, सध्या रा.चिपाडेमळा सारसनगर, ता. नगर जि. अहिल्यानगर, मूळ रा. पुनेवाडी ता. पारनेर जि. अहिल्यानगर) यास सापळा रचून बेड्या घातल्या. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर पारनेर तालुक्यात पाच गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेडे याने उल्हासाबाई यांना सांगितले की, ‘‘मी तुमच्या गावचा तलाठी आहे. तुमची वाढीव पेन्शन जमा झाली आहे. आपण बँकेत जाऊन ती काढू. मी तुमच्या मुलालाही फोन केला आहे.’’ यावेळी उल्हासाबाई यांनी आरोपीवर विश्वास ठेवला. पासबुक घेऊन त्याने त्यांना बँकेच्या बाहेर बसविले. बँकेत जाऊन तुमची पेन्शन घेऊन येतो, असे सांगितले. त्यानंतर लगेच बाहेर येऊन चेडे म्हणाला की, तुम्हाला वाढीव पेन्शन काढण्यासाठी पैसे भरावे लागतील. तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने माझ्याकडे द्या. त्यामुळे महिलेने गळ्यातील २७.९५ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ चेडे यांच्याकडे दिली. त्यानंतर तो म्हणाला की, ‘‘मी माझी मोटार घेऊन दहा मिनिटांत येतो. तुम्ही येथेच थांबा.’’ त्यानंतर तो आलाच नाही. दरम्यान, महिलेस फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत तिने २५ डिसेंबर २५ रोजी आळेफाटा पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.
दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सतीश टाव्हरे, पोलिस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित माळुंजे, नवीन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, प्रशांत तांगडकर यांनी केली आहे.
07638

