डाळिंब बागेला शेडनेटचे कवच
आळेफाटा: जुन्नर तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने आळे येथील डाळिंब बागायतदार सुधीर तानाजी लाड यांनी आपल्या दोन एकर बागेला शेडनेटचे आच्छादन घातले आहे. वाढत्या तापमानामुळे होणारी फूल व फळगळती रोखण्यासाठी त्यांनी हा खर्चिक पण प्रभावी पर्याय निवडला आहे.
मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने तालुक्यातील दूध उत्पादक आणि फळबागायतदार चिंतेत आहेत. ढगाळ वातावरणामुळे आधीच औषध फवारणीचा खर्च वाढलेला असताना, आता कडक उन्हामुळे झाडे कोमेजून फळांचे नुकसान होत आहे. या संकटातून बाग वाचवण्यासाठी लाड यांनी शेडनेटचा वापर केला आहे.
एकीकडे फळबाग वाचवण्यासाठी खते, औषधे आणि आता शेडनेटचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे, तर दुसरीकडे बाजारभाव कमी मिळत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे, अशी खंत लाड यांनी व्यक्त केली. लाड यांचा हा प्रयोग पाहून परिसरातील इतर शेतकरीही आता आपल्या बागांवर आच्छादन करू लागले आहेत.
07883

