
आदिवासी ठाकर समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू
पारगाव, ता. २८ : पहाडदरा (ता. आंबेगाव) येथील ठाकरवाडीत जोगेश्वरी महिला बचत गट (अवसरी खुर्द) च्या सदस्यांनी आदिवासी ठाकर समाजातील महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ७५ महिलांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारा स्टीलचा, टिफीनचा डबा वाण म्हणून देण्यात आला. या उपक्रमामुळे जोगेश्वरी महिला बचत गटाच्या सदस्यांनी या कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम केले आहे.
या वेळी धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, उद्योजिका मोनिका करंजखेले, धनश्री बोऱ्हाडे, अनिता बोऱ्हाडे उपस्थित होत्या. हळदी कुंकवाचे आयोजन जोगेश्वरी बचत गटाच्या अध्यक्षा निर्मला बिडकर, सचिव रेश्मा शिंदे, माजी सरपंच सुनीता कराळे, माजी उपसरपंच स्नेहा टेमकर, भाग्यश्री बिडकर, सुषमा भोर, स्वाती पवार, राजश्री शिंदे, प्रमिला शिंदे, राजश्री ढेपे यांनी केले.