
आंबेगावातील पाणी योजना ठप्प
पारगाव, ता. २३ : आंबेगाव तालुक्यात अनेक गावांच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याच्या कारणाने वीज जोड तोडण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ऐन उन्हाळ्यात बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे वीजजोड पुन्हा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष व टाव्हरेवाडीचे सरपंच उत्तम टाव्हरे यांनी केली.
याबाबत त्यांनी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल हे प्रत्येक ग्रामपंचायतीने जमा केलेल्या पाणीपट्टीमधून भरावे लागते. परंतु, या व्यतिरिक्त नळजोड दुरुस्ती, देखभाल, पाणी पुरवठा कर्मचारी वेतन, वीजपंप दुरुस्ती ही सर्व कामे पाणीपट्टीमधूनच खर्च करावी लागतात. छोट्या गावातील जमा होणारी पाणीपट्टी तुटपुंजी असते. पाणीपट्टीमधून हे सर्व खर्च भागवून वीजबिल भरणे शक्य होत नाही. शासनाच्या आराखड्यानुसार १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून सदर बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज बिलांची थकबाकी वाढत जाते. ‘महावितरण’च्या वतीने सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे वीजबिल थकल्याने वीज जोड तोडण्याची मोहीम सुरु आहे. त्यामुळे अनेक गावातील नळ पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांचे पिण्याच्या पाण्याविना हाल होऊ लागले आहेत. याचा फटका तालुक्यातील अर्ध्याहून अधिक ग्रामपंचायतीला बसला आहे. त्यामुळे राज्य शासन व महावितरण कंपनी बरोबर चर्चा करून संबंधित ग्रामपंचायतींना न्याय मिळवून द्यावा.