आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात 
भाजीपाला, तरकारी पाण्याखाली

आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात भाजीपाला, तरकारी पाण्याखाली

Published on

पारगाव, ता. २७ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असलेल्या मॉन्सूनपूर्व मुसळधार पावसामुळे भाजीपाला तसेच तरकारी पिके, जनावरांचा हिरवा चारा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले असून त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
या अवकाळी वादळी पावसामुळे जारकरवाडी, पारगाव, पोंदेवाडी, काठापूर बुद्रुक, लाखणगाव, देवगाव, खडकवाडी, वाळुंजनगर, मेंगडेवाडी, अवसरी बुद्रुक भागातील शेतकऱ्यांच्या शेतातील मेथी, कोथिंबीर या भाजीपाला पिकाबरोबर, गवार, कोबी, फ्लावर या तरकारी पिकात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पाण्याची तळी झाली आहेत. पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. पिके पाण्यात बुडाल्याने माना टाकून सडण्यास सुरुवात झाली आहे. बाजरी तसेच जनावरांचा हिरवा चारा भुईसपाट झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. पोंदेवाडी येथील कविता कुंडलिक पोखरकर यांनी दोन एकर क्षेत्रात फ्लॉवरची लागवड केली होती. फ्लॉवरच्या रोपांची वाढ चांगली झाली असताना झालेल्या अवकाळी पावसाने शेतातील पिकात पाणी साचल्याने रोपे सडण्यास सुरुवात झाली आहे. फ्लॉवरचे पीक घेण्यासाठी कविता पोखरकर यांना एक लाख रुपये भांडवली खर्च आला होता, तो आता पाण्यात जाणार आहे. पावसाने पीक नष्ट झाल्याने मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com